नागपूर, बीडमध्ये अनेक ठिकाणी गारपीट; आजही पावसाची शक्यता 

पाऊस
पाऊस

पुणे  : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व कर्नाटक परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने गुरुवारी (ता. ४) अचानक सकाळपासून हवामानात बदल झाला. यामुळे मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, विदर्भातील यवतमाळ, नागपूर जिल्ह्याच्या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तुरळक ठिकाणी विजांचा कडाकडाटासह गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली असून आंबा, गहू, संत्रा, कांदा अशा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. बीडमधील कासारी येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.     गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. उन्हाचा चटकाही चांगलाच वाढला असून, कमाल तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत पोचला आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाच्या पट्‌ट्याची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे काही भागांत कमाल तापमानात किंचित चढउतार होत आहे. गुरुवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला असून, अंशत ढगाळ हवामानाची स्थिती झाली. त्यातच सोसाट्याचा वारा सुटून मराठवाड्यातील नांदेडमधील हिमायतनगर, अर्धापूर येथे सकाळी पाऊस पडला. परभणी जिल्ह्याचा परिसर, जिल्ह्यातील सेलू तालुक्यताील हिश्शी येथे दुपारी गांराचा पाऊस पडला. तर गंगाखेड परिसरात जोरदार वाऱ्यासह हलका स्वरूपाचा सरी बरसल्या.   बीड जिल्ह्यातही दुपार नंतर जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यात घडली. मागील आठ ते दहा दिवसांत तापमान ४१ अंशांपर्यंत पोचले. गुरुवारी दुपार नंतर ढगाळ वातावरण झाल्याने तापमानाचा पारा घसरला. काही भागात वादळासह अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई, परळी, केज, आष्टी, किल्लेधारुर, गेवराई, माजलगाव शिरुर कासार या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. केज व अंबाजोगाईत पावसाचा जोर होता. या दोन्ही तालुक्यांत गाराही पडल्या. केज तालुक्यातील कासारीजवळ वीज पडून तारामती बाळासाहेब चाटे (वय ४२) या महिलेचा मृत्यू झाला. तर धारूर तालुक्यातील धुनकवड येथे संदीप श्रीकिसन काळे (वय २०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. अचानक झालेल्या जोरदार पावसाने फळबागांसह आंब्याचे नुकसान झाले. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्‍या परिसरात हलक्या सरी बरसल्या. तर नागपूर शहरातही पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे हवेत किंचित गारवा तयार झाला असला तरी वातावरणात उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील वातावरणावर झाला असून, या भागातही हवामान अंशत ढगाळ होते. त्यामुळे गुरुवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील अमरावती येथे ४३.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

आजही पावसाची शक्यता  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आज (शुक्रवार) उद्या (शनिवार) राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसासह गारपिठीचा अंदाज आहे. तसेच तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवार (ता. ६) पासून राज्यात पुन्हा हवामान कोरडे राहणार असून उन्हाचा चटका वाढणार आहे.   गुरुवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.९ (१९.४), नगर ४२.४ (२०.२), जळगाव ४२.६ (२३.६), कोल्हापूर ३९.८ (२२.७), महाबळेश्‍वर ३५.२ (२१.४), मालेगाव ४२.२ (२४.०), नाशिक ३९.९ (२१.४),  सांगली ४०.६ (२०.३), सातारा ३९.७ (२२.५), सोलापूर ४२.८ (२६.६), सांताक्रुझ ३४.२ (२३.२), अलिबाग ३२.२ (२३.५), रत्नागिरी ३२.६ (२३.९), डहाणू  (२०.०), औरंगाबाद ४०.७ (२२.१), बीड ४२.४ (२३.७), नांदेड ४२.५ (१९.०), परभणी ४२.०, अकोला ४२.७ (२३.३), अमरावती ४३.० (२४.८), बुलडाणा ४०.६ (२५.०), ब्रह्मपुरी ४२.८ (२३.९), चंद्रपूर ४२.८ (२७.२), गडचिरोली ४१.६ (२२.०), गोंदिया ३९.० (२१.०), नागपूर ४१.५ (२४.९), वर्धा ४२.२ (२५.८), वाशीम ४१.८ (२५.०), यवतमाळ ४१.५ (२७.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com