सटाणा तालुक्यात गारपिटीचा दणका 

गेल्या पाच दिवसांपासून अवकाळीचे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे.
Satana damage
Satana damage

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून अवकाळीचे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. प्रामुख्याने सटाणा तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात गारपिटीमुळे नुकसान अधिक आहे. आभाळ कोसळावे याप्रमाणे मंगळवारी (ता. २३) येथील केरसाने गाव व परिसरात झालेल्या गारपिटीमुळे उभे असलेले शेतकऱ्यांचे पीक काही क्षणातच मातीमोल झाले.  सटाणा तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात सलग चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी कायम आहे. त्यात सलग दोन दिवस गारपीट झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडला आहे. मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजेदरम्यान या भागातील केरसाने, तळवाडे दिगर, किकवारी, दसाने, विरगाव, पिंगळवाडे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.  पश्‍चिम भागात रविवारी (ता. २१) तळवाडे दिगर येथे गारपिटीचा तडाखा झाल्यानंतर मंगळवारी (ता. २३) सायंकाळी केरसाने येथे सर्वाधिक गारपीट झाली. त्यामुळे या गावात रस्त्यांसह शेतावर गारांचा खच साचला होता. या भागात प्रामुख्याने उन्हाळ कांदा लागवडी आहेत. सध्या हे पीक काढणीच्या, तर काही ठिकाणी पोसण्याच्या अवस्थेत होते. मात्र गारपीट झाल्याने पात तुटून पडली, तर गारपिटीमुळे तयार होणाऱ्या कांद्याला मार लागल्याने, जखमा झाल्याने या भागात कांद्याचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे.  अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरू होती. मात्र या गारपिटीत काढणीस आलेला कांदा भिजला. एकीकडे रोपवाटिकांचे नुकसान, बियाण्यांची टंचाई, वाढलेला लागवड खर्च या परिस्थितीत पदरमोड करून केलेल्या कांदा लागवडी गारपिटीमुळे पूर्णपणे नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. त्यामुळे एका दिवसाच्या गारपिटीत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मालेगाव तालुक्यात सौंदणे परिसरात झालेल्या पावसामुळे शेवगा लागवडी मोडून पडल्या आहेत. तर निफाड तालुक्यातील कोळगाव, कानळद, रुई, देवगावसह पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक शहर व शहरालगत ग्रामीण परिसरात हलक्या सरी झाल्या. चांदवड तालुक्याच्या पश्‍चिम भागात पाच मिनिटे रिमझिम पाऊस सायंकाळी पडला.  नुकसान असे 

  • कांदा, टोमॅटो, काकडी पिकाचे नुकसान 
  • गहू, हरभरा पिकांना फटका 
  • द्राक्ष बागांच्या खरड छाटण्या झाल्यानंतर नवीन फुटवा तुटून पडला, नवीन काड्या पूर्ण बाधित 
  • अनेक भागांत भाजीपाला पिकेही उद्ध्वस्त 
  • वाऱ्यामुळे शेवगा झाडे उन्मळून पडली. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com