राज्यात गारपीट, वादळाने नुकसान वाढले; शेतकरी चिंताग्रस्त

विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसाने रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
राज्यात गारपीट, वादळाने नुकसान वाढले; शेतकरी चिंताग्रस्त
राज्यात गारपीट, वादळाने नुकसान वाढले; शेतकरी चिंताग्रस्त

पुणे : तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागात दाणादाण उडवली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसाने रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष, काजू, आंबा फळबागांना मोठा फटका बसला, तर उर्वरित भागात गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असून, पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाचही जिल्ह्यांत अनेक भागांत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. गुरुवारी (ता. १८) रात्री व शुक्रवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने शेती पिकांना फटका बसला. आंबा, द्राक्ष या फळपिकांचेही वादळी पावसाने मोठे नुकसान केले. जालना जिल्ह्यातील रोहिलागड, वडीगोंद्री भागात अधिक पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरू होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, ईट, खामसवाडी, येडशी, भूम परिसरात पावसाने दणका दिला. लातूर जिल्ह्यातील उजनी, नळेगाव, किल्लारी, बेलकुंड (ता. औसा), रोहिणा (ता चाकूर), निलंगा येथे पाऊस पडला. शिरूर ताजबद, लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे रिमझिम झाली. जळकोट, वाशी येथे अवकाळीने हजेरी लावली. 

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पुणे जिल्ह्यांतील अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. कोल्हापूर, पुण्यातील हवेली, शिरूर, खेड, जुन्नर अशा काही ठिकाणी वादळी पावसासह गारांचा पाऊस पडत असल्याने गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. नाशिक जिल्ह्यात कसमादेपट्ट्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादकांना चांगलाच दणका बसल्याने द्राक्षाच्या मण्याला तडे गेले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे. सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान केले. 

विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोकणातही मुंबई, ठाणे परिसरांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. भिवापूर (जि. नागपूर) शेतात कापून ठेवलेला हरभरा पावसाने ओला होऊ नये, यासाठी त्यावर ताडपत्री झाकायला शेतात गेलेल्या सचिन रामाजी शहारे (वय ३६, पेंढराबोडी) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खानदेशात गुरुवारी (ता.१८) रात्री अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जोरदार वाऱ्याने मका, गहू, कांदा, दादर ज्वारी ही पिके आडवी झाली आहेत. कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. परंतु जामनेर, चाळीसगाव नजीकच्या काही गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यांत मका पिकाचे सुमारे चार ते पाच हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर गहू पिकाचे सुमारे १० हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. काढणीवरील केळी बागांना रावेर, यावल भागात अंशतः फटका बसला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातही केळी, रब्बी पिकांची हानी झाली आहे. 

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी भागांत वादळी पाऊस पडल्याने आंबा, काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या गुरुवारी (ता. १८) अवकाळी मुसळधार पावसासह गारपिटीने भाजीपाला लागवडीला फटका बसला आहे. आंबा बागायतदारही त्रस्त झाले असून, पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी उशिरा विजांचा कडकडाट, वादळीवारा आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या काजू पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे, तर आंबा पिकाला देखील अवकाळीचा तडाखा बसला आहे. सह्याद्री पट्ट्यातील गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.    वीज पडून दोघांचा मृत्यू  नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १८) किनवट तालुक्यातील चिचखेड शिवारात म्हशी चारत असताना अचानक विजेच्या कडकडाट होऊन अंगावर वीज पडल्याने आनंद श्‍यामराव चव्हाण (वय ६५) यांचा, तर नायगाव तालुक्यातील सुजलेगाव शिवारात झाडाखाली थांबलेल्या माधव दिगांबर वाघमारे (वय ४८) या शेतमजुराचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच एक महिलाही भाजली आहे.

२० बकऱ्या जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्‍यातील वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्यावर दुपारी तीनच्या सुमारास गारांसह तासभर जोरदार पाऊस झाला. गारांच्या माऱ्यामुळे २० बकऱ्या जखमी झाल्या. पावसाचा दणका...

  • खानदेशात गहू, मका झोपला; ज्वारी, कांदा पीक आडवे
  • विदर्भात हरभरा, मिरची, गहू पिकांचे प्रचंड नुकसान
  • मराठवाड्यात पाच जिल्ह्यांत पावसाचा दणका
  • कोकणात आंबा, काजू बागांना गारपीट, अवकाळीचा दणका
  • मध्य महाराष्ट्रात रब्बी पिकांसह फळबागा पावसाने अडचणीत
  • नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांत वीज पडून दोघांचा मृत्यू 
  • परभणी, हिंगोलीत रब्बी पिके, फळबागा अडचणीत
  • नगर जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पाऊस; पिकांचे नुकसान
  • सांगलीत द्राक्ष बागा उन्मळून पडल्या; मोठे नुकसान
  • कोल्हापूर जिल्ह्यात वादळीपावसाने शेतकऱ्यांची ससेहोलपट
  • भुदरगड तालुक्यात गारपीट, २० बकऱ्या जखमी
  • जाफराबाद तालुक्यात वादळी वारा, गारांसह पाऊस 
  • पुणे जिल्ह्यातील काही भागांत गारा; पिकांना दणका
  • अकोला जिल्ह्यात अकोटला पिकांचे सर्वाधिक नुकसान
  • रत्नागिरी जिल्ह्यात भाजीपाला लागवडीला फटका 
  • सिंधुदुर्गात काजू, आंबा पिकांचे गारपिटीने नुकसान
  • या पिकांचे नुकसान...

  • रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, मका आदी
  • फळ : द्राक्ष, काजू, आंबा, डाळिंब, संत्रा, टरबूज, खरबूज 
  • इतर पिके : भाजीपाला, फळभाज्या
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com