खानदेशातील दीड हजार कूपनलिका बंद

खानदेशातील दीड हजार कूपनलिका बंद
खानदेशातील दीड हजार कूपनलिका बंद

जळगाव : दुष्काळाचे संकट दिवसागणिक गंभीर होत आहे. खानदेशातील सुमारे १५०० कूपनलिकांमधील जलपातळी घटल्याने त्या बंदावस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनेक भागांत विस्कळित झाला आहे. टॅंकरचे प्रस्ताव येत आहेत. परंतु, यंत्रणा निवडणुकीत व्यस्त आहे. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदारांकडून गतीने, वेळेत कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. 

शिंदखेडा (जि. धुळे), धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, जामनेर, बोदवड, नंदुरबार भागांतील कूपनलिकांचा त्यात समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत त्या कार्यरत आहेत. पावसाअभावी भूगर्भातच पुरेसे पाणी नसल्याने चाळीसगाव तालुक्‍यातील २८८, धरणगावमधील १५०, पाचोऱ्यातील ८०, भडगावमधील १५०, पारोळा व अमळनेरातील ३८०, शिंदखेड्यातील सुमारे २००, धुळ्यातील १२५, नंदुरबारमधील २८० कूपनलिका सध्या बंद आहेत.

शिवारातील विहिरी, कूपनलिकांनासह ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे स्राेत असलेल्या विहिरी, कूपनलिकांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर होत आहे. मे महिन्यात ही समस्या वाढेल. टॅंकरची मागणी वाढत असल्याची स्थिती आहे. 

यंदा हिवाळ्यातच विहिरींनी तळ गाठला होता. महसूल विभागाकडून अनेक ठिकाणी तात्पुरत्या योजना, विहिरींचे खोलीकरण, विहीर अधिग्रहण करण्यात आले.  भूगर्भातच पुरेसे पाणी नसल्याने खोलीकरण करूनही पाणीप्रश्‍न पूर्णपणे सुटू शकला नाही.

तापी, गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची स्थिती बरी आहे. परंतु, मे महिन्यात गिरणाकाठीदेखील समस्या गंभीर होईल. कारण, तोपर्यंत नदी कोरडी होईल.

जामनेर व बोदवड तालुक्‍यांत ही समस्या गंभीर झाल्याने या भागात टॅंकरचे प्रस्ताव वाढत आहेत. नंदुरबारात टॅंकरची मागणी सर्वाधिक आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या सुमारे ८० टॅंकर सुरू आहेत. खानदेशात टॅंकरची संख्या १६८ वर पोचली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com