हलगीच्या तालावर द्राक्ष बागेची राखण... 

पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आता हलगीच्या कडकडाटात बागेची पाखरांपासून राखण करू लागले आहेत.
halgi
halgi

रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आता हलगीच्या कडकडाटात बागेची पाखरांपासून राखण करू लागले आहेत. पाखरांच्या राखणीत काळानुरूप झालेला बदल पर्यावरणाला पूरक ठरतोय हे विशेष. 

ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असली, तरी आता ज्वारीपेक्षा फळबागांचा जिल्हा म्हणून पुढे येऊ लागला आहे. रब्बी ज्वारीचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे ज्वारीवरील पाखरांनी नवे खाद्य म्हणून आपला मोर्चा आता द्राक्ष बागांवर वळवला आहे. भोरड्यांचे थवेच्या थवे बागेतील द्राक्ष घड फस्त करत आहेत. तर शेतकऱ्यांचा डोळा चुकवून बुलबुल पक्षी मस्त आणि मजेत द्राक्ष मण्यांचा फडशा पाडताहेत. जणू हे पक्षी आज बागेत पार्टी करायलाच आलेत. 

पूर्वी शेतकरी पाखरांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागांवर जाळी लावायचे. या जाळीत अडकून अनेक पक्षी मरत होते. त्यानंतर बागेत पाखरांना पांगवण्यासाठी दारूच्या बंदुकीचा आवाज केला जात होता. हा उपयोगही धोकादायकच ठरला. आता शेतकऱ्यांनी आपल्या सालगड्याची नेमणूक खास द्राक्ष बागेवरील पाखरांच्या राखणीवरच केलेली दिसते. त्यासाठी खास कडकडाट करणारी हलगी त्याला घेऊन दिली आहे.    द्राक्षबागेत हलगी वाजवताना धोंडीबा परकाळे... पहा व्हिडिओ... जणू जुगलबंदीच...  आज विटे भागातील द्राक्ष बागांमध्ये फेरफटका मारला असता भल्या पहाटेपासून सायंकाळी चांगला अंधार पडेपर्यंत सगळीकडे हलगीचा नाद घुमत असतो. हलगी वाजत होती अन् पाखरांचे थवे भुऽऽऽर्रकन उडत होते. या ओळीतून त्या ओळीत बसत होते. हलगीवाला फिरून पुरता दमत होता. द्राक्ष बागांमधील हलगी व पाखरांमध्ये रंगलेली ही जुगलबंदी सध्या पाहायला मिळतेय .  प्रतिक्रिया काय-काय पाखरं हलगीच्या आवाजालाबी घाबरत न्हायती. मंग त्यांच्या जवळ जाऊन हलगी वाजवली की पाखरं उडून जात्यात.  - धोंडीबा परकाळे, हलगीवाला, विटे, ता. पंढरपूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com