हतनूर, गिरणाचे आवर्तन सोडा, ग्रामस्थांची मागणी

हतनूर, गिरणाचे आवर्तन सोडा, ग्रामस्थांची मागणी
हतनूर, गिरणाचे आवर्तन सोडा, ग्रामस्थांची मागणी

जळगाव : जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर होत आहे. तापी काठालगतच्या गावांमध्येही हे संकट वाढत आहे. हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी आसोदा (जि.जळगाव) येथील ग्रामस्थांनी केली. गिरणा धरणाचे पाणी नदीच्या शेवटच्या टप्प्यातील चोरगाव, नंदगाव, फेसर्डीपर्यंत यावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली. 

हतनूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी फक्त कठोरा (ता.भुसावळ) पर्यंत पाणी सोडण्यात आले. पुढे आसोदासह नशिराबाद व इतर पाच गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा स्राेतही तापी नदीमध्येच आहे. त्यासाठी शेळगाव बॅरेजपर्यंत पाणी पोचणे अपेक्षित आहे. परंतु, ते पोचले नाही. आसोदा गावाची पाणी योजना तापी नदीवरून आणली आहे. जलवाहिनीत पाणीच येत नसेल तर तिचा उपयोग काय? जसा उन्हाळा वाढत आहे, तशी ही समस्या गंभीर होत आहे.

नशिराबाद व आसोदा या जिल्ह्यांतील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने पाणी योजनांबाबत गांभीर्याने कामच केले नाही. आसोदा पाणी योजनेबाबत स्ट्रक्‍चरल ऑडिट होण्याची गरज आहे. परंतु, तसेही झाले नाही. मध्यंतरी नदीत पाणी अडविण्यासाठी बंधारा नव्हता. ग्रामस्थांनी दोन लाख रुपये गोळा करून तो बांधला. परंतु त्यात आता पाणीच नाही. अशा स्थितीत उन्हाळ्याचे पुढील दिवस कसे पार पडतील? पशुधन, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल. अनेक जण पिण्याचे पाणी २० ते ३० रुपये प्रतिजार खरेदी करीत आहेत. 

आसोदा ग्रामस्थांना जळगाव शहर नजीक असल्याने पिण्याचे पाणी खरेदी करता येईल. परंतु, पशुधनाच्या पाण्याचे काय? रोजच्या धुणीभांड्यांसाठी पाणी कुठून आणायचे. गोरगरीब रोज पिण्याचे पाणी विकत कसे घेतील? त्यांच्या कमाईचा मोठा भाग रोज पाण्यासाठीच लागेल. मग त्यांनी आपल्या इतर गरजा कशा पूर्ण करायच्या? असा प्रश्‍नही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com