इंग्लंडमध्ये हापूस निर्यातवाढ शक्य 

इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून, त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे.
hapus mango
hapus mango

रत्नागिरी ः इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून, त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे. त्याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून, हापूसची निर्यात ३० ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत रत्नागिरीतून पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशभरातून दरवर्षी विविध प्रकारच्या आंब्यांची पन्नास हजार टन निर्यात होते. यामध्ये इंग्लंडला ३ ते ४ हजार टनांपर्यंत निर्यात करण्यात येते. त्यात कोकणातील हापूसचा टक्का वीस टक्के आहे. दरवर्षी सरासरी ६०० टन हापूस इंग्लंडमध्ये जातो. युरोपियन देशांसाठी उष्णजल प्रक्रिया आवश्यक होती. फळमाशीवर नियंत्रणासाठी ४८ अंश सेल्सिअस तापमानाला ६० मिनिटे फळ पाण्यात ठेवून ही प्रक्रिया होते. त्यासाठी लासलगाव आणि वाशीसह रत्नागिरीतील पॅकहाउसमध्ये सुविधा आहे. युरोपिअन देशांच्या समूहातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर विविध वस्तूंच्या निर्यातीवर यंदा शिथिलता आणली गेली. त्यानुसार भारतामधून निर्यात होणाऱ्या १६ वस्तूंचा समावेश आहे. याचा फायदा भारतामधून निर्यात होणाऱ्या आंब्यासह हापूसला होणार आहे. 

उष्णजल प्रक्रियेमुळे पातळ साल असलेल्या हापूसचा दर्जा घसरत होता. यावर पणनने अभ्यास करून निकष बदलाची मागणी केली होती. त्यावर निर्णय झालेला नाही. परंतु इंग्लंडने निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा फायदा अनेक बागायतदारांना होणार आहे; मात्र आंब्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून प्रोटोकॉल निश्‍चित करण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.  या आहेत अटी  इंग्लंडला आंबा पाठवताना पॅकहाउसमध्ये होणाऱ्या सर्व प्रक्रिया केल्या जातील. त्या फळाची प्रतवारी करणे, वॉशिंग, ब्रशिंग आणि कूलिंग केले जाईल. त्याचबरोबर शासकीय परवानगी असलेल्या पॅकहाउसचे फायटो सर्टिफिकेट अत्यावश्यक केले आहे. 

प्रतिक्रिया इंग्लंडने बंधने शिथिल केल्यामुळे त्याचा फायदा हापूसच्या निर्यात वाढीला होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू आहे.  - भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन 

इंग्लंडमध्ये भारतामधून येणाऱ्या आंब्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शासनाने विशिष्ट प्रोटोकॉल ठरवले पाहिजेत. सरसकट आंबा बाजारात आला तर दर्जावर आणि दरावर परिणाम होऊ शकतो.  - तेजस भोसले, व्यावसायिक, इंग्लंड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com