लासलगावमार्गे हापूस आंबा अमेरिकेत

आंबा निर्यात
आंबा निर्यात

नाशिक: खास चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय आंब्याने अमेरिकावासीयांना भुरळ पाडलेली आहे. यंदाचा हंगाम सुरू झाला असून निर्यातप्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा अधिक निर्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी लासलगाव येथून प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी लासलगावमार्गे अमेरिकेला निर्यात सुरू झाली आहे.  लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया दहा तारखेपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात चार टन आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. चालू वर्षीच्या हंगामात १० एप्रिल ते जून अखेरपर्यंत निर्यात कालावधी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती अॅग्रोसर्ज ईरेडियेटर्स (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे कार्यकारी संचालक प्रणव पारेख यांनी दिली.  अमेरिकेत आंबा जाण्यापूर्वी निर्यातपूर्व विकिरण प्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण भारतातून आंबा लासलगाव येथे येतो. लासलगाव सह मुंबई, बंगळूर येथे विकिरण केंद्रे उपलब्ध आहेत. मात्र, लासलगाव येथील कृषक केंद्राची क्षमता अधिक असल्याने मुख्यत्वे लासलगाव केंद्र महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढव‌िली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच शिवाय कोयीतील कीड नष्ट होण्यास मदत होते. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहतो. भारतीय आंब्याच्या हापूससह केशर, बदामी, रत्ना, चौथा, लंगडा या वाणांची निर्यात अमेरिकेत करण्यात येणार आहे. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्राच्या विकिरण केंद्रामध्ये मुंबईच्या अॅग्रो सर्ज या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जाणार आहे. आंब्याच्या होणाऱ्या निर्यातीकरिता अमेरिकेच्या निर्यात धोरणानुसार विविध निकष देण्यात आले असून, त्यांच्या नियमानुसार ही आंब्याची निर्यात होणार आहे. यासाठी अमेरिका कृषी विभाग व भारत सरकार यांचे प्रतिनिधी फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देऊन याबाबत कामकाज पाहत आहेत. संपूर्ण देशभर आंब्याचे उत्पादन अधिक होण्याचे जरी व्यापाऱ्यांकडून बोलले जात असले. तरी नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी होणार हेही वास्तव आहे.  लासलगाव येथील कृषक या पथदर्शक विकिरण प्रक्रिया प्रकल्पात श्री. पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव येथील कृषकचे निवासी विकिरण सुरक्षा अधिकारी महेंद्र अवधानी व संजय आहेर हे काम पहात आहेत. एकूण १५ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत.  कांद्याचा प्रकल्प आंब्यावर विकिरण करण्यासाठी वापरात ३१ ऑक्टोबर २००२ रोजी लासलगाव येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते भाभा अणू संशोधन केंद्राच्या माध्यमातून कांदा विकिरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आला होता. मात्र, सध्या तो आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी वापरात आहे. हा प्रकल्प सध्या मुंबई येथील ‘अॅग्रोसर्ज’ कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे.  लासलगाव येथून अमेरिकेला झालेली निर्यात (टनांत)

वर्ष    निर्यात 
२०१५ ३५०
२०१६ ५४४
२०१७ ५६७
२०१८ ४९०
   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com