‘लॅब टू लँड’ संकल्पना उत्पन्नवाढीसाठी राबविणार: हरीभाऊ जावळे

हरिभाऊ जावळे
हरिभाऊ जावळे

पुणे ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे पंतप्रधानाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत चांगले संशोधन पोचणे आवश्यक आहे. आज कृषी विद्यापीठे संशोधनामध्ये सर्वांत पुढे आहेत. मात्र, अजूनही संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाही. कृषी विद्यापीठातील शेतकरी उपयोगी संशोधन पोचविण्यासाठी 'लॅब टू लँड' ही संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी दिली.   कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार आमदार श्री. जावळे यांनी सोमवारी (ता. २९) सायंकाळी स्वीकारल्यानंतर मंगळवारी (ता. ३०) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  श्री. जावळे म्हणाले, की शेतकऱ्यांनी शेती व्यावसायिक पद्धतीने करण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान उभे करावे लागणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत चांगले तंत्रज्ञान पोचले तरच चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळेल. त्यातून चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. याशिवाय संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ असतात. त्यांना फिरते पीक चिकित्सालयाची जोड दिली तर तालुका स्तरापर्यंत पोचून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व रोग किडीचे नियंत्रण करणे अशा बाबी राबविता येतील.  कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या कृषी दर्शनीमध्ये पीकनिहाय माहिती उपलब्ध करून दिली आहे. ती कृषी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. ‘‘कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, जे अधिकारी, कर्मचारी आहेत, त्याच्याकडून शेतकरी उपयोगी काम करून घेतले जाईल. त्यासाठी निधीची पुरेशा प्रमाणात गरज आहे. कृषी संशोधनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद आहे. त्यातून कृषी विद्यापीठातील संशोधनाचे बळकटीकरण करावे लागणार आहे. संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध होण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे प्रयत्न केले जातील. परिषदेकडून पुरेसा निधी उपलब्ध झाल्यानंतर संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया हे सूत्र अवलंबविता येईल.  कृषी पदवी, पदव्युत्तर पदवी घेऊन विद्यार्थी प्रशासनामध्ये जातात. त्यामुळे कृषी क्षेत्रात काम करणारे चांगले विद्यार्थी राहत नाहीत. येत्या काळात कृषी क्षेत्रात चांगले विद्यार्थी काम करण्यासाठी राहावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न कायम आहे. तो महाडीबीटीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com