दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार ः हरिभाऊ जावळे

हरिभाऊ जावळे
हरिभाऊ जावळे

पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करा, अशा सूचना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी दिल्या आहेत.  चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व संचालक यांच्यासमवेत बुधवारी (ता. १४) झालेल्या आढावा बैठकीत परिषदेने खासगी कृषी व संलग्न महाविद्यालयांची स्थिती जाणून घेतली. राज्यात काही खासगी संख्यांकडून होत असलेली लूट, सुविधांचा अभाव व त्यातून कृषी शिक्षणाला आलेली मरगळ यामुळे गेल्या काही वर्षांपासून खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या विरोधात कारवाईची मागणी होते आहे. विशेष म्हणजे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वतः या समस्येची दखल घेतली आहे.  ‘राज्यातील कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करावेत. मात्र, दर्जाही कृषी शिक्षण देणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईदेखील झाली पाहिजे,’ अशा स्पष्ट शब्दात उपाध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  भारतीय कृषी संशोधन परिषदेने अलीकडेच घोषित केलेल्या विद्यापीठ क्रमवारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. केंद्र शासनाच्या धोरणानुसार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या कार्यक्रमात राज्याची कामगिरी उंचावण्यासाठी कृषी विद्यापीठांना संशोधन व विस्तार काम वाढवावे, असे सूचित करण्यात आले.  विद्यापीठांनी आतापर्यंत संशोधनात केलेली प्रगती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचली पाहिजे. तसेच दुसरीकडे विविध पीक पद्धती आणि पर्यायी पिकांबाबत भरीव संशोधन करायला हवे, असे परिषदेतर्फे सांगण्यात आले. “दापोली विद्यापीठाच्या शेतीतळे व पिंजरा मत्स्यशेती या संकल्पनेबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, तसेच एकात्मिक पीक पद्धतीचे विद्यापीठांनी तयार केलेले मॉडेल ठराविक गावांसाठी न ठेवता सर्व भागात त्याचा प्रसार करावा,” अशाही सूचना उपाध्यक्षांनी दिल्या.      राज्य शासनाने जळगावच्या रावेर भागातील पाल येथे सरकारी विज्ञानविद्या महाविद्यालय स्थापन करण्याचे ठरविले आहे. याबाबत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने तसेच हिंगोणा येथे ऊती संशोधन केंद्र स्थापनेबाबत आपापल्या स्तरावरील कामांना गती द्यावी, असे विद्यापीठांना सांगण्यात आले.  ‘शेतकऱ्यांच्या प्रयोगांचा संशोधनात समावेश करा’ ‘प्रत्येक कृषी विद्यापीठाने आता प्रयोगशाळा ते प्रक्षेत्र ही संकल्पना आपापल्या भागात राबवावी. त्यातून शेतकरी प्रशिक्षित होतील. तसेच, शेतकरी स्वतः त्यांच्या शेतात प्रयोग करतात. विद्यापीठांनी आपल्या संशोधन कामात या प्रयोगांचाही समावेश करावा,’ अशी सूचना परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com