योग्य पद्धतीने कांदा काढणी, साठवणूकीचे नियोजन  

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता साधण्यासाठी किंवा निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी उन्हाळी कांद्याची साठवणूक करणे आवश्यक आहे.
automatic onion grading machine and storage facility
automatic onion grading machine and storage facility

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता साधण्यासाठी किंवा निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी उन्हाळी कांद्याची साठवणूक करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे योग्य पद्धतीने साठवल्यास जातीपरत्वे पाच महिने टिकू शकतो. त्यात एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइट रेड किंवा अर्का निकेतन या जातीचा कांदा सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या प्रकारे टिकू शकतो. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात. खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही.  खताच्या नियोजनाचा साठवणीवर होणारा परिणाम 

  • माती परीक्षणानुसार मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन केले पाहिजे.  खतांची मात्रा, प्रकार आणि सिंचनाचे नियोजन यांचा साठवणीवर खूप परिणाम होतो. 
  • सर्व नत्रयुक्त खते लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत दिली पाहिजेत. त्यापेक्षा उशिरा नत्र दिल्या माना जाड होतात व कांदा टिकत नाही. 
  • पालाशमुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते. 
  • गंधकासाठी अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते. जर तुम्ही संयुक्त दाणेदार खतांचा वापर करत असल्यास त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात. गंधकाच्या पूर्ततेसाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे हे साठवणीसाठी आवश्यक आहे.
  • पाणी देण्याची पद्धत 

  • पाणी देण्याच्या प्रमाणाचा  परिणाम साठवणीवर होत असतो. कांदा पिकाला पाणी कमी; परंतु नियमित लागते. कांदा पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते. कांदा पिकासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन अधिक फायदेशीर ठरते. 
  • काढणीअगोदर जमिनीच्या प्रकारानुसार २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. त्यानंतर पात पिवळी पडून कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.
  • कांदा सुकवणे  

  • काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल, अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. 
  • त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. 
  • चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. 
  • राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. 
  • या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात. त्यामुळे वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
  • हे टाळावे 

  • कांदा काढला की कापून लगेच ढीग लावणे. 
  •  ओल्या पानांनी ढीग झाकणे.
  • हे करावे 

  • कांदा काढून तो पानासहित वाळवावा. यामुळे पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते. कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. परिणामी कांदे चांगले टिकतात.
  • साठवणगृहाची स्थिती-

  • साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. 
  • साठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्यूत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे.
  • नैसर्गिक वायुवीजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असते. 
  • दिशा -  एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्चिम करावी. 
  • लांबी रुंदी -  चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. 
  • तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. 
  • चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. 
  • तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.
  • सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
  • चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.
  • कांद्याची साठवण करताना 

  • चाळीतील कांद्याच्या ढिगाची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही.
  • पाखीची रुंदी ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त रुंदी वाढवल्यास वायुवीजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. 
  • कांदा साठविण्याआधी एक दिवस अगोदर चाळीत बुरशीनाशकाची फवारणी करून निर्जन्तुक करावी. 
  • कांदे टाकताना जास्त उंचावरून टाकू नये.
  • पावसाळ्यात बाजूने कांदे ओले होणार नाही  याची काळजी घ्यावी .
  • अशाप्रकारे कांदा पिकाची योग्य प्रकारे काढणी करून काळजीपूर्वक साठवणूक केल्यास कांदा जास्त दिवस टिकतो. 
  • संपर्क- योगेश भगुरे,९९२२४१४८७३ (उद्यानविद्या विभाग , कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com