राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला नाही ः चंद्रकांत पाटील

राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला नाही
राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला नाही

मुंबई ः भाजप-शिवसेना महायुतीला पुन्हा सरकार स्थापनेसाठी स्पष्ट जनादेश मिळालेला आहे. मात्र, सत्तास्थापनेत विलंब होत असल्याने कायदेशीर चर्चेसाठी राज्यपालांची भेट घेतली, सत्तास्थापनेचा दावा केला नाही, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. ७) दिली. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार उपस्थित होते. 

लवकरात लवकर महायुती सरकार स्थापन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. मात्र, सत्तास्थापनेत विलंब होत असल्यामुळे काय करता येईल, याबाबत राज्यपालांशी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांना महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीची माहिती दिली. आमची सविस्तर चर्चा झाली, आता भाजपचे नेते याविषयी निर्णय घेणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यानंतर भाजप नेते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी रवाना झाले. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आली. शिवसेना आमदारांच्या बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावले टाकणार असल्याचे बोलले जात होते.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता १५ दिवस उलटले आहेत. तरीही सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता ५०-५० चा फॉर्म्युला, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद यावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. 

निवडणुकीत भाजपने २८८ पैकी १०५ जागांसह सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला १४५ हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी इतर पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे. शिवसेनेला आत्तापर्यंत ८ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ५६ वरून ६४ वर पोचले आहे. भाजपला ११ अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचे संख्याबळ १०५ वरून ११६ जागांवर पोचले आहे. युतीचे एकत्रित संख्याबळ १८० वर जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com