तुरीचे हेक्टरी ४० क्विंटल उत्पादन शक्य

तूर पीक
तूर पीक

अकोला ः देशातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीचे ठिबक सिंचन पद्धतीने योग्य खत व्यवस्थापन, तसेच अन्य व्यवस्थापन काटेकोर असल्यास हेक्टरी ४० क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मागीत तीन वर्षांत घेतलेल्या प्रयोगांतून हे स्पष्ट झाले आहे. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत तूर उत्पादन वाढीसाठी असलेल्या या शिफारशीस मान्यतासुद्धा मिळाली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्यादृष्टीने ही शिफारस अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  तूर हे राज्यात घेतल्या जाणाऱ्या कडधान्यांपैकी प्रमुख नगदी कडधान्यवर्गीय पीक आहे. राज्यात तुरीचे सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सध्या तुरीची सरासरी उत्पादकता हेक्टरी ९३७ किलो आहे. कोरडवाहू क्षेत्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. हे पीक पाण्यासाठी अतिसंवेदनशील आहे. जमिनीतील कमी ओल व फुले लागल्यानंतर पाण्याचा ताण बसल्यास या पिकात मोठ्या प्रमाणात फूलगळ होते, असा शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. तुरीला गरजेनुसार व पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यादृष्टीने विद्यापीठात गेली तीन वर्षे ठिबक सिंचनाद्वारे तूर पिकात पाणी व्यवस्थापन करण्यात आले. पाणी व्यवस्थापनासोबतच विद्राव्य रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले.  विद्राव्य खतांची कार्यक्षमता वाढली, उत्पादन वाढले पारंपरिक पद्धतीत शेतकरी रासायनिक खते फोकून देतात. यात बऱ्याच प्रमाणात खतांची नासाडी होते आणि आवश्यक मूलद्रव्ये पिकास मिळत नाहीत. पर्यायाने उत्पादन खर्च वाढून तुरीचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेनुसार व गरजेनुसार ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते दिल्यास त्यांची कार्यक्षमता ९५ टक्क्यांपर्यंत वाढते. तसेच २५ टक्क्यांपर्यंत त्यांच्यात बचत होऊन उत्पादन वाढल्याचे निष्कर्ष या प्रयोगातून स्पष्ट झाले आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे तुरीचे प्रती हेक्टरी ४०.५३ क्विंटल उत्पादन मिळाले. यातून १ लाख ८९ हजार १३१ रुपये नफा मिळाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागातील संशोधक डॉ. संजय काकडे यांनी याबाबत सलग तीन वर्षे प्रयोग केले. यात याच विद्यापीठाच्या ‘पीकेव्ही तारा’ या वाणाची निवड केली. पाण्यात विद्राव्य रासायनिक खतांच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारे विभागून दिल्या. त्याद्वारे पिकाच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामाचे निष्कर्ष काढले. तुरीचे अधिक उत्पादन व रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. यात शिफारसीच्या १२५ टक्के नत्र (३१.२५ किलो / हेक्टरी), १०० टक्के स्फुरद (५० किलो /हेक्टरी फॉस्फोरिक आम्लाच्या माध्यमातून) आणि १०० टक्के पालाश (३०किलो/हेक्टरी) पाच वेळा विभागून देण्याची शिफारस करण्यात आली आहे.  खतमात्रा आणि कालावधी १० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीच्या वेळी २० टक्के  शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश-  पेरणीनंतर ४० दिवसांनी २० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीनंतर ६० दिवसांनी २५ टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीनंतर ८० दिवसांनी २५ टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीनंतर १०० दिवसांनी  ः डॉ. संजय काकडे , सहायक प्राध्यापक, मो. ९८२२२३८७८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com