जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे अंजीर

Health Benefits of Figs
Health Benefits of Figs

अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक असतात. त्यामुळे हृदयाचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते. अंजीर फळातील औषधी गुणांमुळे पित्त विकार, रक्तविकार व वात हे आजार दूर होतात. अंजिरामध्ये कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजिरातील विविध खनिजे, जीवनसत्वे आणि तंतूमय घटकांमुळे आरोग्यदायी आहे. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक जीवनसत्त्व अ, बी१, बी२, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सोडियम, पोटॅशिअम हे घटक आहेत. असतात. ताज्या अंजिरापेक्षा सुक्या अंजिरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. फायदे

  • शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. अंजीर हे थंड असते.  
  • अंजिरामध्ये तंतुमय घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.  
  • अंजीर फळातील औषधी गुणांमुळे पित्तविकार, रक्तविकार व वात हे आजार दूर होतात.  
  • अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक असतात. त्यामुळे हृदयाचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.   
  • पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजिराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.  
  • आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.  
  • अंजिरामध्ये कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.   
  • अंजिरामधील पोटॅशिअम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.   
  • अंजिरामुळे शक्ती, ऊर्जा वाढते.  
  • कमी आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठी अंजिराचे सेवन फायद्याचे आहे. अंजिरामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असून, हा क्षार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करीत असतो. ज्यांच्या शरीरामध्ये या क्षाराची कमतरता आहे, त्यांनी नियमितपणे अंजिराचे सेवन करावे.  
  • अंजिरामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी किंवा हाडांशी निगडित व्याधी आहेत, त्यांनी अंजिराचे नियमित सेवन करावे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याच्या प्रक्रियेला अवरोध निर्माण होईल.  
  • अंजिराची पाने ही गुणकारी आहेत. अंजिराची पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्स ची मात्रा नियंत्रित राहते. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर चरबी साठविली जाते, त्याला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. जर याची मात्रा शरीरामध्ये वाढली, तर लठ्ठपणा, हृदयरोग इत्यादी व्याधी उद्भवू शकतात  
  • ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात तंतूमय घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस २ अंजीर खाणे अधिक फायदेशीर आहे.  
  •  अंजिरामध्ये तंतुमय घटक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. पोट अधिक काळ भरलेले राहून भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी अंजिरे खावीत.  
  • अमेरिकन जर्नल मधील क्लिनिकल न्यूट्रिशिनमध्ये प्रकाशित लेखानुसार उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांक जास्त असतो. ज्यामुळे ते शरीरास लाभदायक आहे. ज्यांना वजन वाढवायचे असेल, त्यांनी अंजीर दुधामध्ये भिजवून खावे.  
  • चाळिशी च्या महिलांसाठी अंजिराचे सेवन अतिशय लाभकारी आहे. त्याने शरीरामध्ये कॅल्शिअम मिळते, तसेच महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची संभावना कमी होते.  
  • डांग्या खोकला आणि दम्याच्या विकारात देखील अंजिराचे सेवन गुणकारी आहे. तसेच बद्धकोष्ठ, अपचन, पोटदुखीसारख्या विकारांसाठी अंजीर फायदेशीर आहे. अंजिराच्या सेवनाने यकृताचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.  
  • अंजिरातील बहुगुणी पोटॅशिअम तत्त्व रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रित करतो. अंजिरातील प्रतिरोधक तत्त्व रक्तातील ग्लुकोज आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.  
  • सुकी अंजीर रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला होणाऱ्या त्रासाला कमी करतो. हृदयातील नलिकांमधील अडथळे दूर करण्यात अंजीर लाभदायक आहेत.
  • अंजीर खाताना घ्यावयाची काळजी

  • चांगल्या परिणामासाठी ताजे अंजीर खावे. जास्त नरमलेले अंजीर खाऊ नये.  
  • अंजीर आधी स्वच्छ धुवून मग कपड्याने पुसून त्यानंतर खावे. अंजीर कापण्यासाठीचा चाकू कोमट पाण्याने धुवून घ्यावा.  
  • आपल्या प्रकृतीनुसार अंजिराचे सेवन करावे.  
  • सुके अंजीर सातत्याने जास्त खाल्ल्यास दाताच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
  • ५) ज्यांना अंजिराची ॲलर्जी असेल त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच आहारात समावेश करावा.  
  • अंजिराचे सेवन संयमित करणे फार जरुरी आहे. नाही तर पचनसंस्थेतून रक्तस्राव होऊ शकतो.  
  • अंजिराचे सेवन योग्य मात्रेतच घ्यावे जास्त घेतल्यास पित्ताची समस्या होऊ शकते.
  • संपर्क ः सुवर्णा पटांगरे, ९८३४९९३८२४ (के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com