उन्हाचा चटका वाढू लागला

राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात सकाळपासून ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे.
Heat
Heat

पुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात सकाळपासून ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात अजूनही काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत या भागात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.   गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरूवात झाली आहे. तर राज्यातील अनेक भागातून मंगळवारी (ता.२७) परतीच्या मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे पावसाने मराठवाडा व विदर्भात आणि खानदेशातील अनेक भागांत उघडीप दिली आहे. सध्या या भागांत सकाळपासून ऊन पडत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जळगाव येथे मागील दोन ते तीन दिवसांपासून ३५.३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.  राज्यात मध्यरात्रीनंतर कमाल तापमानाचा पारा कमी होत असून पहाटे बऱ्यापैकी थंड वारे वाहत आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. सातारा, महाबळेश्वर, अलिबाग, बुलडाणा या भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

मॉन्सून आज निरोप घेण्याची शक्यता राज्यात धुमाकूळ घातलेल्या परतीच्या मॉन्सूनने महाराष्ट्रातील अनेक भागातून माघार घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण देशातून माघार घेण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण असल्याने आज (ता.२८) देशातून निरोप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पावसाची उघडीप राहणार असून सकाळपासून ऊन पडणार , त्यामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात लागलीच थंडी सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.  मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या सरी कोकणातील सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, व सोलापूर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्गमधील अंजर्ला, अंगावली, कोंडेया, राजापूर, कुंभावडे, पाचल, विलवडे अशा काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. पावसामुळे या भागांत भात काढणी काही प्रमाणात खोळंबली आहे. तर मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने शेतकरी पावसाच्या उघडिपीची वाट पाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com