कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
ऊन वाढण्यास प्रारंभ
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (ता.१) विरून गेल्याने राज्यात पुन्हा कोरडे वातावरण झाले आहे. यामुळे थंडीत चढउतार होत असले, तरी सकाळपासून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे.
पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (ता.१) विरून गेल्याने राज्यात पुन्हा कोरडे वातावरण झाले आहे. यामुळे थंडीत चढउतार होत असले, तरी सकाळपासून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक भागांत काही ठिकाणी किंचित थंडी आहे. मंगळवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मध्य महाराष्ट्रात चक्रीय स्थिती असल्याने काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने किमान तापमानासह कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. २) सकाळपासून उन्हाचा चटका वाढला होता. दुपारी कडक ऊन पडल्याने कमाल तापमानात वाढ झाली
आहे.
सध्या राज्यात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात जवळपास चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भातील काही भागात तापमानात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत चंद्रपूर येथे ३९.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. तसेच किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव चांगलाच कमी झाल्याची स्थिती आहे.
मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात थंडी कमी झाल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सांगली, कोल्हापूर भागांत सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कोकणातही थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. या भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढत असल्याने उकाडा वाढू लागला आहे.
मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने किमान तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात थंडी कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा कमी वेगाने वाढला आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या भागांतील किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
सोमवारी (ता. १) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१)
- ठाणे २१
- अलिबाग २१.७ (२)
- रत्नागिरी २४ (३)
- डहाणू २२.६ (३)
- पुणे १६ (२)
- जळगाव १३ (३)
- कोल्हापूर २३.७ (५)
- महाबळेश्वर १८.२ (२)
- मालेगाव १७.२ (३)
- नाशिक १५.५ (३)
- निफाड ११.५
- सांगली २२.१ (५)
- सातारा २०.९ (४)
- सोलापूर २२.६ (२)
- औरंगाबाद २०.५ (४)
- बीड १९.३ (३)
- परभणी १९.६ (१)
- परभणी कृषी विद्यापीठ १७.२
- नांदेड १७.५ (१)
- उस्मानाबाद १८.४ (१)
- अकोला १८.२
- अमरावती २१.१ (२)
- बुलडाणा २२.४ (३)
- चंद्रपूर २०.२ (१)
- गोंदिया १७ (-१)
- नागपूर १७.३
- वर्धा १९ (१)
- यवतमाळ २०.५ (१)