उन्हाचा चटका; उकाडा नकोसा

हवामान
हवामान

पुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या काही भागांत सातत्याने उष्ण लाट आहे. उन्हाचा वाढलेला चटका आणि उकाडा अक्षरश: नकोसा होत आहे. दिवसभर असलेला उकाडा रात्री देखील कायम राहत आहे. यातच पूर्वमोसमीच्या सरी न बरसल्याने यंदाचा उन्हाचा अधिकच तापदायक ठरत आहे.  राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमान ४० ते ४६ अंशांदरम्यान असल्याने उष्ण लाट आली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिकच वाढत असल्याने वाऱ्याची झुळकही गरम भासत आहे. काही दिवसांपासून सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा ताप वाढत असून, सायंकाळी सहा वाजल्यानंतरही उन्हाच्या झळा कायम असल्याचे अनुभवायला येत आहे. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.  विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे आहे. यात बह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. तर मराठवाड्यातील परभणी येथे ४४.८ अंश, नांदेड ४४.२ अंश तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ४३.२, जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर गुरुवारपर्यंत विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  रविवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४ (२.२), जळगाव ४३.० (०.७), कोल्हापूर ३८.० (३.१), महाबळेश्वर ३३.२ (३.८), मालेगाव ४१.२ (१.२), नाशिक ३७.९ (०.५), सांगली ४०.० (३.२), सातारा ४०.४ (५.२), सोलापूर ४३.२(३.३), अलिबाग ३१.३ (-१.९), डहाणू ३४.६ (०.२), सांताक्रूझ ३४.४ (०.९), रत्नागिरी ३५.२ (२.३), औरंगाबाद ४०.८ (१.६), नांदेड ४४.२ (२.७), परभणी ४४.८ (३.०), अकोला ४३.८ (१.९), अमरावती ४३.६ (१.६), बुलडाणा ४१.३ (३.४), बह्मपुरी ४५.९ (३.३), चंद्रपूर ४६.८ (३.६), गोंदिया ४५.० (२.३), नागपूर ४६.३ (३.५), वाशीम ४३.४, वर्धा ४५.५ (२.८), यवतमाळ ४४.५(२.८).  मॉन्सूनची बुधवारपर्यंत प्रगती शक्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली. बुधवारपर्यंत (ता. २९) मॉन्सूनची आणखी काही भागात प्रगती होण्याची शक्यता आहे. यंदा केरळमध्येही मॉन्सून ६ जूननंतर दाखल होण्याचे संकेत आहेत. तर हिंद महासागरात ढगांची गर्दी होऊ लागली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com