कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
कोकणात यंदा उन्हाचा पारा चढणार
राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यंदा कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे.
पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यंदा कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह, कोकणातील नागरिकांचा चांगलाच घाम निघणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका जाणवणार असला, तरी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जातो. ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम’ प्रारूपाच्या (मॉडेल) आधारे हवामान विभागाने मार्च ते मे २०२१ या तीन महिन्यांतील तापमानाचा अंदाज सोमवारी (ता. १) जाहीर केला आहे.
या अंदाजानुसार उन्हाळ्यात उत्तर, वायव्य आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाच्या झळा वाढणार आहेत. तसेच पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगडसह पश्चिम किनाऱ्यावरील कोकण, गोव्यात कमाल तापमान सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे. कोकण-गोवा विभागात रात्रीच्या किमान तापमानाचा पारा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘‘उत्तर, वायव्य, ईशान्य भारतातील सर्वच विभागांसह, पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात, सौराष्ट्र, कोकण-गोवा या विभागांत कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतासह लगतच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या मध्य भारतातील विभागांत दिवसा कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे,’’ असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील रात्रीच्या किमान तापमानाचा विचार करता, हिमालय पर्वताचा पायथ्यासह उत्तर भारत, वायव्य भारत, मध्य भारताचा पश्चिम भाग (कोकण-गोवा), दक्षिण भारताच्या किनारपट्टीय भागात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार आहे. तर पूर्व, मध्य भारतातील बहुतांशी विभागांसह, जम्मू- काश्मीर राज्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
प्रशांत महासागरात ला-निना स्थिती
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असून, या भागात सध्या मध्यम ला-निना स्थिती आहे. उन्हाळ्यातही या भागात ला-निना स्थिती टिकून राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.