रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो हेक्टर भातशेतीचे नुकसान

भातशेती पाण्याखाली
भातशेती पाण्याखाली

रत्नागिरी  ः जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला असून नदीकिनाऱ्याजवळील शेती पाण्याखाली गेली आहे. संगमेश्‍वर, चिपळूण, राजापूर तालुक्यांतील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे सुरू आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बावनदी, काजळी या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी पात्राशेजारील भागात शिरले आहे. पाण्याबरोबर आलेला गाळ शेतजमिनीत साचून राहिल्याने लावण्यात आलेली शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कमी-अधिक होत असला तरीही शेतजमिनीत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे. संगमेश्‍वर तालुक्यात दहा गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात लोवले, बुरंबी, फुणगुस, मुचरी, कोंड्ये, कुरधुंडा, गावमळा, कोळंबे, वांद्री, धामणी, आंबेड खुर्द यांचा समावेश आहे. येथील शंभरहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  कोंड्ये येथे नदीपात्र बदलल्यामुळे प्रवाहाचे पाणी शेतजमिनीतून वाहत आहे. या परिसरात सुमारे दोनशे एकर जमीन आहे. त्याला धोका निर्माण झाला आहे. राजापूर तालुक्यातील अणसुरे येथे खारलॅण्ड बंधारा फुटून खारं पाणी भातशेतीत गेले आहे. त्यामुळे २५ शेतकऱ्यांचे ८ ते ९ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. येथील पूर्ण भातशेती खाऱ्या पाण्याखाली गेली आहे. तत्पूर्वी तिवरे धरण फुटल्यामुळे तीन गावे बाधित झाली होती. त्यात तिवरेतील ९३ शेतकरी, कादवडमधील १६ तर आकलेतील २९ शेतकरी बाधित झाले असून त्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.  यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले, की पावसाळ्यातील नुकसान हे नैसर्गिक आपत्तीचा भाग असल्यामुळे तहसीलदार कार्यालयामार्फत पंचमाने होतात. सध्या भातलावण्यांची कामे सुरू आहेत. पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला नाही. दरम्यान कोंडये येथील सरपंच पूनम देसाई म्हणाल्या, की नदीपात्र बदलल्यामुळे येथील भातशेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com