राज्यात शेतकऱ्यांवर महासंकट; ऑक्टोबरमधील पावसाने कोट्यवधींचे नुकसान

पीक नुकसान
पीक नुकसान

पुणे : ऑक्टोबर महिना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टकक्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.  सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही. अवघी सुगी वादळी पावसाने मातीआड दडली गेली. धान्यापासून ते कपाशीच्या सरकीला कोंब फुटले अन्‌ शेतकऱ्याचा धीरच गळला. हतबलता वाढली, शिवारे सुन्न झाली. दुष्काळात किमान खर्च होत नाही, इथे तर पराकोटीची झुंझ अपयशी ठरली होती.  दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी द्राक्ष पट्ट्यातही प्रतिकूल हवामानाने बागातदारांची धाकधूक वाढली होती. काढणीला आलेली अर्ली द्राक्षे आणि फुलोऱ्यातील द्राक्ष बागा वाचविण्यासाठी दिवसरात्र युद्धाचा प्रसंग होता. बेसुमार खर्च होऊन तो आतापर्यंत प्रति किलोला ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोचला होता. अशातच पावसाने गाठल्यानंतर ५० टक्क्यांवर नुकसान झाल्याचे बागातदारांचे लक्षात आले. रोगराईने डोके वर काढले, बागा १०० टक्के सोडून देण्याची अनेकांवर वेळ आली. काढणीला आलेल्या ‘अर्ली द्राक्षां’चा डोळ्यांदेखत खच पडला आणि हे महासंकट किती भयानक आहे, याची जाणीव करून दिली.  बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणकाळात पावसाच्या पाण्याने ती सडली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेे. ...असे झाले नुकसान

  •    मका, बाजरी, ज्वारी पिकांच्या कणसात पाणी शिरून दाण्यांना कोंब
  •    शेंगांना पाणी लागल्याने सोयाबीन, तूर, भुईमुगाचे दाणे सडले
  •    बोंडात पाणी शिरल्याने कापूस ओला झाला, सरकीला पुन्हा कोंब फुटले
  •    काढणीच्या अवस्थेतील लाल कांद्याचे पीक नुकसान, रांगड्याची रोपे कुजली
  •    द्राक्षात मोठी फळगळ, अर्ली व्हराटींचे थेट नुकसान
  •    रोग-किडी, बुरशी आदींचा पिकांवर प्रचंड प्रादुर्भाव
  •    मूळकुज होऊन भाजीपाला, फळभाज्यांची अन्न प्रक्रिया खंडित
  •    डाळिंब, आंबा, लिंबू, मोसंबी, संत्रा यांचा ताण मोडला
  •    ताण अवस्थेतील बागांना पावसामुळे फळधारणेस अडचणी
  •    वाढलेल्या आर्द्रतेमुळे अंजिराचा खट्टा बहर अडचणीत
  •    पेरू, सीताफळात कीड-रोगांचे प्रमाण वाढले
  •    खुल्यावरील झेंडू, शेवंती, गुलाब आदी फुलपिकांचे नुकसान
  • यंदाच्या खरिपातील प्रमुख पिकांचे क्षेत्र...(हेक्टर)

  •    भात  :  १४ लाख ७७ हजार ८७९
  •    ज्वारी  :  २ लाख ७९ हजार ३२८ 
  •    बाजरी  :  ६ लाख ५४ हजार ८१२
  •    मका  : ८ लाख ६६ हजार ००५
  •    तूर  :  १२ लाख ७ हजार ४७७
  •    भुईमूग  :  १ लाख ८७ हजार ५००
  •    सोयाबीन  :  ३९ लाख ५९ हजार ५४९
  •    कापूस  :  ४३ लाख ८३ हजार ७०७ 
  • एकूण पीक लागवड (इतर पिके धरुन) : १ कोटी ३८ लाख ७२ हजार ८६६ 
  • ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही, कमी-अधिक प्रमाणात येथे खरिपाचे नुकसान झाले आहे.  नुकसानग्रस्त पिके....

  • खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी
  • फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी
  • भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी
  • फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com