धरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरूच

धरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरूच
धरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरूच

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा मुसळधार पाऊस सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह नाशिक, पुणे जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहे. भीमा गोदावरी नद्यांना पाणी आल्याने उजनी, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. उजनी धरण आज (ता. ३०) उपयुक्त पातळीत येण्याची शक्यता असून, कोयना धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्याच्या काही भागाला पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. कणकवली तालुक्यातील गडनदी, जानवली नदी दुथडी भरून वाहत आहेत. तर वैभववाडी तालुक्यातील शुक आणि शांती या दोन्हीही नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. पुराचे पाणी भातशेती आणि बागायतीमध्ये घुसले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला असून नदीकिनाऱ्याजवळील शेती पाण्याखाली गेली आहे. संगमेश्‍वर, चिपळूण, राजापूर तालुक्यांतील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बावनदी, काजळी या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सांगली जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला. चांदोली धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू होती. दुष्काळीपट्ट्यात पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दमदार पाऊस जोर कायम राहिला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. पश्चिमेकडे महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कऱ्हाड, वाई, या तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. नद्याच्याही पाणीपातळीत वाढ झाल्याने नद्यांनी दुथडी भरून वाहत आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला, चासकमान, वीरसह कळमोडी, आंद्रा, वडीवळे, वडज धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा नदीला पूर आले आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून सोमवारी सोमवारी ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूर आला आहे. खानदेशात मागील चार-पाच दिवस झालेल्या पावसात नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील कमाल लघू व मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील तापी नदीवरील हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले होते. सोलापूर पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू होता. गेल्या दोन दिवसांत जवळपास ५२ टक्के पाणी धरणात आले आहे. पाण्याचा विसर्ग याच गतीने राहिल्यास किंवा वाढवल्यास धरण उपयुक्त पातळीत येण्याची शक्‍यता आहे. अकोला जिल्ह्यात सातपुड्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे सातपुड्यातून उगम पावणाऱ्या व तेल्हारा तालुक्यामधून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला पूर आला. तेल्हारा तालुक्यातील भोकर येथे नदीच्या पाण्यात जनावरांसाठी चारा आणायला गेलेला युवक वाहून गेल्याची घटना घडली. मराठवाड्यातील हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर राहिला. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर , बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाला. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : वैभववाडी २३०, संगमेश्वर १३०, चिपळूण १२०, दापोली ११०, जव्हार, महाड, माणगाव प्रत्येकी १००, पोलादपूर ९०, मंडणगड, मोखेडा, सावंतवाडी, सुधागड पाली प्रत्येकी ८०, भिरा, गुहागर, खालापूर, खेड, प्रत्येकी ७०. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २४०, इगतपुरी २३०, लोणावळा (कृषी) १२०, त्र्यंबकेश्वर १००, हर्सुल, जावळी मेढा प्रत्येकी ८०, गगनबावडा, नवापूर, ओझरखेडा, पेठ, शाहुवाडी, सुरगाणा, वेल्हे प्रत्येकी ७०, राजगुरुनगर, मुक्ताईनगर, पौड प्रत्येकी ६०, बोदवड, पाटण, शिरपूर, वडगाव मावळ प्रत्येकी ५०, चंदगड, जुन्नर, पाचोरा, पन्हाळा, राधानगरी, रावेर प्रत्येकी ४०, आजरा, भोर, दिंडोरी, गारगोटी, जामनेर, कराड, ओझर, पाथर्डी, सातारा, शिराळा प्रत्येकी ३०. मराठवाडा : किनवट ३०, बीड, भोकरदन, देगुलूर, धर्माबाद, हिमायतनगर, जळकोट, कन्नड, सिल्लोड, सोयेगाव प्रत्येकी २०. विदर्भ : चिखलदरा १५०, बल्लारपूर, धारणी प्रत्यकी ९०, लाखंदूर, कुरखेडा प्रत्येकी ८०, देसाईगंज, चांदूरबाजार, कुही, परतवाडा, अकोट प्रत्येकी ६०, मलकापूर, वरूड, धानोरा, मुलचेरा, सिरोंचा, नागभिड, पवनी, कोर्ची, बर्शीटाकळी प्रत्येकी ५०, अरमोरी, अंजनगाव, अहेरी, संग्रामपूर, मोर्शी, तेल्हारा, जळगाव जामोद, जेवती, कळमेश्वर प्रत्यकी ४०. घाटमाथा : अम्बोणे २३०, कोयना (पोफळी) १६०, लोणावळा (टाटा) १३०, शिरोटा, वळवण प्रत्येकी १२०, शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी ११०, खोपोली १००, दावडी ९०, डुंगरवाडी ८०, कोयना (नवजा), भिरा, खंद प्रत्येकी ७०, भिवपुरी ६०. राज्यात मुसळधारेचा इशारा राज्यात मॉन्सून सक्रीय असल्याने सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मॉन्सूनचा आस पूरक ठरल्याने आज (ता. ३०) राज्यात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com