नाशिक जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह गारांचा पाऊस

नाशिक जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह गारांचा पाऊस
नाशिक जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह गारांचा पाऊस

नाशिक : वादळी वाऱ्यासह निफाड व सिन्नर तालुक्यांत सोमवारी (ता. १५) सायंकाळी गारांचा पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे कांदा, चारा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. गारांचा तडाखा बसून टरबूज, आंब्यासह अन्य फळपिकांचे नुकसान झाले. दुष्काळी स्थितीनंतर आता या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात नांदूर शिंगोटेपासून वावी, पाथरे, उजनी, सोमठाणे, देवपूर, वडांगळी, गुळवंच, दातली या भागांत जोरदार गारांचा पाऊस पडला. निफाड तालुक्यात खेडलेझुंगे, करंजी, ब्राह्मणवाडे, तामसवडी, तारुखेडले, म्हाळ साकोरे, मांजरगाव, चापडगाव,  भेंडाळी, भुसे, गाजरवाडी, नांदूर माध्यमेश्वर या गावांसह परिसरात पाऊस झाला. 

जिल्ह्यातील पूर्व भागात नांदगाव तालुक्यात कासारी, मोरझर, आमोदे, बोराळे, मळगाव, कळम दरी, जमदरी या परिसरात हजारो क्विंटल कांदा भिजला. आता तो खराब होण्याची शक्यता आहे. पशुपालकांनी साठविलेल्या बाजरी, मका चारा, सोयाबीन भुसा भिजल्याने मोठे नुकसान झाले. बागलाण तालुक्यात गेल्या चाळीस वर्षांत पहिल्यांदाच रेतीचे वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आदिवासी पश्चिम पट्ट्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.

अंतापूर येथील कांदाचाळी, गुरांचे गोठे, घरावरील पत्रे उडाले. शेततळ्यांचे कागद उडून सुमारे ३५ ते ४० शेततळ्याचे कागद फाटले. यामुळे दुष्काळात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. कृषी विभागाने पाहणी करून दुरुस्तीसाठी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नंदूरशिंगोटे परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस पडला. यानंतर पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शुक्रवारच्या तुलनेत सर्वच ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. उजनी, सोमठाणे, वडांगळी, मेंढी, देवपूर, निमगाव देवपूर, गुळवंच, दातली या भागांत गारपीट झाली. गुळवंच, देवपूर परिसरांत गारांचा खच निर्माण झाल्याचे दिसून आले.

वादळाच्या भीतीने जनावरांसाठी ठेवलेला चारा सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व झाकण्याची शेतकऱ्यांमध्ये लगबग होती. सिन्नरच्या पूर्व भागात विशेषतः वडांगळी, सोमठाणे परिसरात कांदा पीक काढणीला आहे. हजारो टन कांदा शेतात पडून आहे. काढणी केलेला कांदा चाळीत वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. येथील काही शेतकऱ्यांनी टरबुजाचे पीक घेतले आहे, त्यामुळे फळांवर गारांचा तडाखा बसला. गारांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे चित्र होते.

द्राक्ष, गव्हाला फटका निफाड तालुक्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शिल्लक बागांवर काही ठिकाणी फटका बसला. अनेक ठिकाणी गहू काढणीला आहे . मात्र वादळ, वारांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागा शिल्लक आहेत. त्या शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com