मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमान

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. तर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत ओढे, नदीकाठच्या पिकांना पुराचा फटका बसला.
flood
flood

नांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. तर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत ओढे, नदीकाठच्या पिकांना पुराचा फटका बसला. यामुळे खरिपातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी व तूर पिकाचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या सोयाबीनला मोड फुटले, तर कापूस गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

परभणी जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत सर्वच तालुक्यांत पाऊस झाला. सेलू तालुक्यात शुक्रवारी (ता.१८) रात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. करपरा, दुधना नदीला पूर आला तर ओढ्या-नाल्याजवळील शेतजमीन खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. राजेवाडी गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून दोन ते तीन तास पुराचे पाणी गेले. वारा व मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उंच वाढलेला कापूस जमिनीवर लवंडला. मुसळधार पावसाने शेतीसह खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

मानवत तालुक्यात काही भागांत पावसाने कपाशीचे व काढणीस आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. जायकवाडी धरण व माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यात पूर्णा मंडळात १४० मिलिमीटर पाऊस कोसळत अतिवृष्टी झाली. चुडावा व पूर्णा मंडळात कापूस, तूर, ऊस, सोयाबीन, मूग, हळद ही पिके प्रभावित झाली. फळबागांचेही त्यामुळे खूप नुकसान झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश भागात उडीद, मूग याप्रमाणे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला मोड फुटले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, तर काही भागात सोयाबीनची वाढ झाली; पण धुक्यामुळे फुलगळ झाल्यामुळे सोयाबीन झाडाच्या नुसत्या काड्या उभ्या आहेत. जी परिस्थिती सोयाबीन तीच परिस्थिती ज्वारी, कपाशी, हळद पिकांची आहे. 

जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसाचा फटका पिकांना बसला आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव येथे चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली असून सोयाबीनला मोड फुटले आहेत. गिरगावसह परिसरातील परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्ड बुदुक, डिग्रस खुर्द या गावांत रविवारपासून मुसळधार पाऊस पडला. यात ऊस, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मूग, उडीदसुद्धा शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यात सोयाबीनची आशा होती; पण हेसुद्धा मोड फुटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

उस्मानाबाद तालुक्यात कसबे तडवळेसह गोपाळवाडी, खामगाव ,दुधगाव कोंबडवाडी, जवळे, रुई, तुगाव, खेड व कळंब तालुक्यातील वाघोली, सातेफळ सौंदणा,गौर, दहीफळ, सापनई या शिवारात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शिवारामधुन वाहणाऱ्या लहान मोठ्या नदी नाल्या तुडुंब भरुन वाहील्या. शिवारातुन जाणारी व सर्वात मोठी असणारी तेरणा नदी देखील दुतर्फा भरुन वाहीली. पावसाचा तडाखा इतक्या जोराचा होता की या तडाख्यामध्ये शिवारातील उसाचे फड अक्षरशः जमिनदोस्त झाले आहेत तर काढणिला आलेले सोयाबिन देखिल पाण्याने पुर्णपणे लोळले आहेत.

पावसाने मोठा फटका

  •   परभणी, हिंगोलीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी
  •   काढणीला आलेल्या सोयाबीनला आले मोड
  •   वेचणीला आलेला कापूस गळून पडला
  •   गोदावरी, करपरा, दुधना नदीला पूर 
  •   अनेक ठिकाणी जमीन खरडली
  •   फळबागांमध्ये मोेठ्या प्रमाणात फळगळ, झाडे उन्मळून पडली
  •   फळपिकांसह ज्वारी, तूर, ऊस, मूग, उडीद, हळद पिकांचे नुकसान
  • प्रतिक्रिया दिवस-रात्र काबाडकष्ट करुन जोपासलेले ऊस पावसाच्या एका तडाक्याने होते का नव्हते झाले. अवघ्या दोन-तीन महीन्यांत तोडणीला आलेला ऊस आडवा झला.  - भागवत डोंगरे, शेतकरी, सापनई, ता. कळंब ..... शेवगळ व परिसरात सातत्याने होत असलेला जोरदार पाऊस आसाच सुरू राहीला तर सोयाबीन व कापूस पिके घरात येईल का नाही ते पन सांगता येत नाही. मूग तर शेतकऱ्यांचा गेला.  - संदिप प्रकाशराव लोंढे पाटील, शेवगळ, ता, घनसावंगी, जि. जालना .... पंधरवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. २ एकरातील सोयाबीन काढणीला आलं अन् पाऊस लागून बसला. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. पीक हाती येण्याची आशा नाही. — ज्ञानोबा तिडके,  पांगरी, ता. परळी, जि, बीड.

    कयाधू नदीला पूर, पिके पाण्याखाली  इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी सोडल्यामुळे कयाधू नदी व पैनगंगा नदी या संगमावरील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. हदगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे हाताशी आलेले सोयाबीन, ज्वारी  व कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुरुवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे पाथरड, कंजारा, शिवनी, कोपरा वाळकी, धानोरा, बोरगाव, टाकळा, लिंगापूर, रावणगाव, धोत्रा, कामारी या गावातील नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com