भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस
भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस

नगर ः काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजेपर्यंत रतनवाडीत २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळपासून मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणातून होणारा विसर्ग कमी केला आहे. 

अकोले तालुक्‍यातील सर्व धरणे भरल्यानंतर काही दिवस थांबलेला पाऊस भंडारदरा पाणलोटक्षेत्रासह तालुक्‍यात कालपासून (रविवार) पुन्हा सुरू झाला. अगोदरच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणातसह दक्षिणेतील सर्व धरणे भरलेले असल्याने पाण्याची आवक वाढल्यामुळे मुळा, निळवंडे व भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. सोमवारी रात्री मुळा धरणातून २ हजार, भंडारदरा धरणातून एकवीस हजार तर निळवंडे धरणातून ३४ हजार ८०० क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात होता. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला होता. आज सकाळी (मंगळवारी) मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा विसर्गही कमी केला होता. 

सकाळी दहा वाजता भंडारदरा धरणातून ३ हजार २००, निळंवडे धरणातून ५ हजार ४८० तर ओझर बंधाऱ्यातून २२ हजार १३० क्युसेकने विसर्ग केला जात होता. मुळा धरणात कोतूळ जवळन ६५९२ क्युसेकने मुळा धरणात आवक होत असल्याने मुळा धरणातून २ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. आज मंगळवारी मात्र अकोलेच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. नगर जिल्ह्याच्या अन्य भागात सोमवारी काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, अजूनही बहुतांश भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आता रब्बीच्या पेरण्याला लवकरच सुरवात होणार आहे. मात्र, परतीचा पाऊस जोरदार झाला नाही तर अडचणीला सामोरे जावे लागते की काय याची चिंता कायम आहे. 

सकाळी सहापर्यंत चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः घाटघर - १८५, रतनवाडी- २१५, पांजरे- १६०, वाकी- १४०, भंडारदरा- १८३, निळवंडे ः ५२, आढळा ः ३०, अकोले ः ६०, कोतूळ ः २४, संगमनेर ः ३२, ओझर ः २३, श्रीरामपूर ः २१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com