रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले

रत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळूण शहरात पाणी घुसले. जगबुडी पुलाला पाणी लागले. तो वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. खेड बाजारपेठेसह परिसरातील घरांत पाणी शिरल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. रत्नागिरी-गुहागर मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द करंजीकर मोहल्ला येथे दरड कोसळल्याने दहा घरांना धोका निर्माण झाला आहे.

सोमवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी पाऊस ५९.७८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १४५, दापोली ३१, खेड ११०, गुहागर २२, चिपळूण १३५, संगमेश्‍वर १४, रत्नागिरी १, लांजा ३२, राजापूर ४८ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. खेड तालुक्यातील जगबुडी आणि चिपळूणमधील वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी गाठली. 

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेडची रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गासह आणि दापोली मार्गही बंद करण्यात आला आहे. खेड बाजारपेठेतही पाणी शिरल्यामुळे व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावांचा संपर्क तुटला असून, येथील जनजीवन विस्कळित झाले. 

खेडमधील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हे भाग पाण्याखाली गेले आहेत. बहादूरशेख नाक इथला पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद केली आणि ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. खेडपाठोपाठ मंडणगड, दापोली, देवरूख, साखरपा, लांजा, राजापूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे.चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द करंजीकर मोहल्ला येथील सकाळी दरड कोसळली. त्यामुळे मंजूर परकार, अली परकार, सुलतान परकार, हलीमा अब्दुल कादिर परकार, सल्लादिन परकार, नजीर परकार, फईन परकार यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com