कोल्हापूर, रत्नागिरीत मुसळधार; सांगलीत संततधार

कोल्हापूर, रत्नागिरीत मुसळधार; सांगलीत संततधार
कोल्हापूर, रत्नागिरीत मुसळधार; सांगलीत संततधार

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. पश्‍चिम भागाचे जनजीवन विस्कळित झाले असून, पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांचे, ओढ्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने विविध मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान, राधानगरी धरण मंगळवारी (ता.३०) सकाळपर्यंत ९५ टक्के भरले. याशिवाय सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुळसधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात मात्र संततधार पाऊस झाला. मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३१.५० मि. मी. पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक ७८.३ मलिमिटर पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, जत, तासगाव तालुक्‍यातदेखील पावसाने हजेरी लावली. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेतील सुमारे ३५ हून अधिक दुकाने रात्रभर पाण्याखाली गेली. राजापुरातील जवाहर चौकात पाणी भरले असून, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्येही क्षमतेच्या ७५ टक्के पाणीसाठा झाला. मंगळवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक २२६ मिमी. पाऊस झाला. मंगळवार दुपारपर्यंत विविध नद्यांवरील ८० बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

गगनबावडा मार्गाने जाणारी वाहतूक बंद केली आहे असून, कळेमार्गे गगनबावडा जाणारी वाहतूक; तसेच कोल्हापूरकडून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वैभववाडीकडून येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार भोगाव व पोहाळेतर्फे बोरगाव येथे अंदाजे तीन फूट पाणी रस्त्यावर आले आल्याने येथील वाहतूकही बंद आहे. पोहाळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. पन्हाळा तालुक्‍यातील गोठे-परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. 

चंदगड तालुका घटप्रभा नदीवरील आडकूर कानडेवाडी तारेवाडी बंधारे, शेणगाव बंधारा, चंदगड तालुक्‍यात घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे, आडकूर कानडेवाडी, तारेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील कुरतनवाडी, हल्लारवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. ठिकठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यात संततधार

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. २९) सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. शिराळा तालुक्‍यात ४८ मिलिमीटर पाऊस पडला. दुष्काळी पट्ट्यातही पावसाची रिमझिम सुरू आहे. चांदोली धरणात २६.५९ टीएमसी पाणीसाठा झाला असून वीजनिर्मिती केंद्रातून ६०० क्‍युसेकने विसर्ग सुरू केला आहे. शिराळा तालुक्‍यातील आरळा-भाटवाडी येथील फरशीवजा पूल सलग तीन दिवस पडत असणाऱ्या पावसाने वाहून गेला. शिराळा तालुक्‍यातील भातशेतीमध्ये पाणी साठून राहिले आहे. ओढेनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सोनवडे, मणदूर, आरळा, काळोखेवाडी, खोतवाडी, मिरुखेवाडी या ठिकाणी बांधफुटीमुळे शेतीचे नुकसान झाले. पावसामुळे वारणा, कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

सोमवारी वारणा धरणातून कालवा व विद्युतगृहाद्वारे ६०० क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एक जनित्र सुरू झाले आहे. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागात गेल्या चार दिवसांपासून कधी मुसळधार; तर कधी संततधार पाऊस सुरूच आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ८ हजार २०१ क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. चांदोली परिसरातील मणदूर, सोनवडे, आरळा, करुंगली, वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने बांधफुटी झालेल्या शेतीची पाहणी करून पंचनामा करावा, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

रत्नागिरीत चांदेराई बाजारपेठेतील दुकाने रात्रभर पाण्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ९३.७८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ११०, दापोली ८७, खेड १२०, गुहागर ८२, चिपळूण १२०, संगमेश्‍वर १०४, रत्नागिरी ५०, लांजा १६०; तर राजापुरात ११० मिमी. पावसाची नोंद झाली.

राजापूर तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढल्याने अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. दुपारपर्यंत जवाहर चौकातील नदीकिनाऱ्‍यालगतच्या टपऱ्‍या पाण्याखाली गेल्या होत्या; तर शिवाजी पथ, वरची पेठ रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. पाणी वाढत असल्यामुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेतही पाणी शिरले. पावसाचा जोर कायम असून समुद्र खवळलेला होता.

सांगलीतील तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस
मिरज  २२.४
जत ११.६
खानापूर-विटा २२.४
वाळवा-इस्लामपूर ४०.५
तासगाव २४.५
शिराळा ७८.३
आटपाडी ४.७
कवठेमहांकाळ २०
पलूस ३३
कडेगाव ४३.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com