कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर

केळझर धरण
केळझर धरण

 पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेली पूरस्थिती कायम आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला असून, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे, तर जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ४५०, तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ४०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात तुफान पाऊस पडत आहे. धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरीसह उपनद्यांना महापूर आल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गोदावरी, दारणा, कादवा या नद्यांना आलेल्या मोठ्या पुराचा फटका बसत असून, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.   गोदावरीला पूर आल्यामुळे नगर जिल्ह्यामधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा तालुक्‍यांतील नदीकाठच्या सुमारे दोनशे पस्तीस कुटुंबांना रविवारी रात्री सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. सोमवारी नांदूर मध्यमेश्‍वर येथून पाण्याचा विसर्ग कमी केलेला असला तरी, पूरपरिस्थिती कायम होती. निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीकाठच्या लोकांनीही काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

पाणलोटात धुवाधार बरसात सुरूच असल्याने पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भीमा नदीच्या सर्व उपनद्यांना पूर आल्याने मुळा-मुठेसह भीमा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा आणि कानंदी, आरळा, मीना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने या सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून एक लाख तीन हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कृष्णा, कोयना, उरमोडी, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांत तसेच शेतात पाणी घुसले आहे. 

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पाण्याची पातळी ४५ फूट पाच इंच इतकी झाली. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सांगली इस्लामपूर मार्ग सकाळपासून बंद करण्यात आला. कोयना आणि वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने महापुराचा धोका आणखी गडद झाला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. काजळी नदीच्या रौद्ररूपाने जुवे, हातीस, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्‍वरला बसला. शेकडो घरात पाणी घुसले असून नागरिकांना स्थलांतर करावे लागले. राजापूर, चिपळूण, संगमेश्‍वरमध्येही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून पूरसदृश्‍य स्थिती आहे. वादळी वाऱ्यांमुळे घरे, गोठे कोसळण्याचे प्रकार सुरू घडले आहेत. समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा किनारपट्टीच्या देवबाग तळाशील, आचरा या भागाला बसला आहे.

खानदेशातील जळगाव जिल्ह्यामधील तोंडापूर प्रकल्प, धुळे जिल्ह्यातील जामखेडी, मालनगाव, बुराई व पाझरा प्रकल्प, तर नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली व दरा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. गिरणा धरणाचा साठाही वाढला आहे. गिरणा धरणात नाशिकमधील हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा, पुनद या प्रकल्पांमधून पाण्याचा प्रवाह येत आहे. तापी नदीवरील मुक्ताईनगरजवळील हतनूर धरणाचे आठ दरवाजे सोमवारी (ता. ५) सकाळी ९ वाजता पूर्णपणे उघडण्यात आले. सातपुड्यातील अक्कलकुवा, धडगाव भागातील उदय नदीला, नवापुरातील रंगावली नदी, शहादामधील सुसरी, गोमाई नद्यांना पूर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात सोमवारी (ता. ५) दुपारी दोन वाजेपर्यंत ४४.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात झालेल्या अति जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पामधून २ लाख ९० हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने नागमठाण येथे गोदावरीने धोक्‍याची पातळी ओलांडली. नाशिक, नगर जिल्ह्यातील विसर्गामुळे जायकवाडीतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सकाळपासून अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. दिवसभर थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरू होती. पण, किमान सुरवात झाली याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला. पुणे जिल्ह्यातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने आल्याने उजनी धरणाची पाणीपातळी सोमवारी (ता. ५) सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोचली. उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडून ३० हजार क्‍युसेक इतके पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे भीमा नदीकाठी पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने विविध भागातील चार हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिरोळ तालुक्‍यात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर शहरात तर पंचगंगेच्या पाण्याने कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :

कोकण : जव्हार ४५०, वाडा २९०, मोखेडा २८०, रत्नागिरी २७०, माथेरान २५०, चिपळूण २२०, पोलादपूर २२०, लांजा २१०, संगमेश्वर, भिरा प्रत्येकी २००, मंडणगड १९०, राजापूर १८०, खेड १७०, सावंतवाडी १६०, महाड, ठाणे, कर्जत प्रत्येकी १५०, खालापूर १४०, कुडाळ, गुहागर, भिवंडी प्रत्येकी १३०, उल्हासनगर, दोडामार्ग, विक्रमगड प्रत्येकी ११०, पनवेल, वैभववाडी, अंबरनाथ, कणकवली, दापोली, माणगाव, मालवण प्रत्येकी ११०, कल्याण १००, मुरबाड, म्हापसा, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, सुधागडपाली, पेण, शहापूर, देवगड प्रत्येकी ९०. 

मध्य महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर ४००, महाबळेश्वर ३८०, इगतपूरी ३७०, गगणबावडा २८०, हर्सुल २६०, पेठ २४०, लोणावळा २३०, ओझरखेडा २३०, दिंडोरी २१०, पौड १७०, नाशिक १६०, सुरगाणा १५०, चंदगड, पन्हाळा प्रत्येकी १४०, वेल्हे, राधानगरी, जावळीमेढा प्रत्येकी १३०, नवापूर १२०, पाटण, धडगाव, शाहूवाडी प्रत्येकी ११०, अकोले, भोर, कोल्हापूर, वडगाव मावळ प्रत्येकी १००, साक्री, खेड, सिन्नर, कराड, आजरा, सातारा प्रत्येकी ९०, शिराळा, घोडेगाव प्रत्येकी ८०, अक्कलकुवा, हातकणंगले, कागल, वाई प्रत्येकी ७०, कडेगाव, कळवण, गारगोटी, तळोदा, गडहिंग्लज, कोरेगाव प्रत्येकी ६०.     मराठवाडा : उमरगा ६०, नांदेड ४०, निलंगा ३०, वैजापूर, फुलांब्री प्रत्येकी २०, उदगीर, कन्नड, तुळजापूर, औरंगाबाद, लोहारा, खुल्ताबाद प्रत्येकी १०. 

विदर्भ : अकोट, चिखलदरा, वर्धा प्रत्यकी २०, कुरखेडा, सेलू, दर्यापूर, धारणी, देवळी, जळगाव, सिरोंचा, एटापल्ली, रामटेक, नांदगावकाझी, लाखंदूर, आरमोरी, अर्जुनी मोरगाव, कामठी, संग्रामपूर, अंजणगाव, मूल प्रत्येकी १०.  

घाटमाथा : दावडी ३७०, ताम्हिणी ३५०, शिरगाव ३१०, कोयना नवजा, कोयना पाफळी प्रत्येकी ३००, आंबोणे २९०, डुंगरवाडी २८०, खंद २७०, भिवापुरी २५०, शिरोटा, २२०, खोपोली २१०, लोणावळा २००, वाणगाव १९०, वळवण १८०, ठाकूरवाडी १६०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com