कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ 

कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले. मुंबईसह उपनगरांतील सर्वच रस्ते जलमय होऊन रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.
lcrop damage
lcrop damage

पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले. मुंबईसह उपनगरांतील सर्वच रस्ते जलमय होऊन रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत पनवेल येथे सर्वाधिक ३०६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने अगोदरच संकटात असलेल्या पिकांचे जास्त नुकसान केले. 

कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी वगळता अन्य सर्व तालुक्यात दिवसभरात अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी झाल्या. रत्नागिरी, लांजा तालुक्यांत काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. बुधवारीही पावसाचा जोर कायम होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत दुपारी बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. मुसळधार पावसामुळे वेंगुर्ल्यातील एका घरात पाणी शिरले. त्या घरातील पाच जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पुन्हा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. नाशिक जिल्ह्यात देवळा मंडळात ८३.६ मिलिमीटर पाऊस झाला. यासह लोहोणेर येथेही मुसळधार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात नांदगाव, सिन्नर, चांदवड, मालेगाव, कळवण, येवला, दिंडोरी तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. तर पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा जोर कमी होता. मात्र पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने कामे अडचणीत आले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, भडगाव, जळगाव, रावेर, यावल, भुसावळ तालुक्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात रात्रीत चार तासात एकूण १२५ मिलिमीटर पाऊस पडला. धुळ्यातील धुळे, शिरपूर, धुळे, साक्री या तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात मंगळवारी एकूण १२२ मिलिमीटर पाऊस झाला. शिरपुरात अतिवृष्टी झाली. कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान खानदेशात झाले. मका, तुरही अनेक भागात आडवी झाली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून अनेक भागात पावसाची काही प्रमाणात उघडीप होती. 

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाचा काहीसा जोर कायम आहे. परभणी जिल्ह्यांतील ३६ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनी खरडून गेल्या असून सोयाबीन, कपाशी, ज्वारी, हळद, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. हिंगोली, जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गोदावरी, दुधना, पूर्णा, करपरा, कयाधून या नद्यांच्या पुराचा फटका पिकांना बसला आहे. 

वऱ्हाडात मंगळवारी धुमाकूळ घालणारा पाऊस बुधवारी (ता.२३) काही अंशी कमी झाला. अनेक ठिकाणी चार दिवसानंतर सूर्यदर्शन झाले. काही भागात ऊन सुद्धा पडले. सलग पावसामुळे पिके धोक्यात आलेली असून शेतकरी आता उघाडीची अपेक्षा करीत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पावसाची उघडीप मोठी आहे. पाऊस उघडला तरच हे पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकेल अशी अवस्था आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने शेतीतील कामांना सुरुवात झाली होती. पूर्व विदर्भात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या असल्या तरी अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. 

पावसाचा फटका 

  • मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपले 
  • मुंबईतील रस्त्यांवर पाणी तुंबले 
  • रेल्वेसह वाहतूक व्यवस्था ठप्प 
  • शासकीय कार्यालयांना सुट्टी 
  • कोकणात मुसळधार पावसाची हजेरी 
  • खानदेशातही अनेक ठिकाणी धुमाकूळ 
  • मराठवाड्यात पुन्हा वादळी पाऊस 
  • कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ 
  • विदर्भात ठिकाठिकाणी पाऊस 
  • पिकांची स्थिती झाली बिकट 
  • शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी 
  • १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झालेली ठिकाणे  कुलाबा १४७.८, सांताक्रुझ २८६.४, पालघर ११२.४, वसई १८२, माथेरान १६३.४, पनवेल ३०६.८, रोहा १०२.२, तळा १०५, उरण १५३, वैभववाडी १३१, ठाणे १९४.५, गगणबावडा १६५.  बुधवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये) ः (स्त्रोत, हवामान विभाग)  कोकण : डहाणू ४२.१, अलिबाग ६३.६, कर्जत ६७.८, खालापूर ५३, महाड ३७, माणगाव ४४, म्हसळा ६०, मुरूड ५०, पेण ९६, श्रीवर्धन ९८, सुधागडपाली ७७, गुहागर ४५, लांजा ५५, राजापूर ५९, रत्नागिरी ३९.५, संगमेश्वर ५२, देवगड ९७, दोडामार्ग ४२, कणकवली ७५, कुडाळ ६५, मालवण ९८, रामेश्वर ४१.२, सावंतवाडी ६६.४. 

    मध्य महाराष्ट्र : अकोले ८५, कोपरगाव ३३, पाथर्डी ४५, संगमनेर ३८, धुळे ६३, भाडगाव ५५, दहीगाव ४४.८, धरणगाव ७६, एरंडोल ३७, जामनेर ५२, पाचोरा ६५, पारोळा ६१, यावल ४४.२, आजरा ३४, चंदगड ६१, गारगोटी ३८, पन्हाळा ४०, राधानगरी ६०, चांदवड ४५, देवळा ८३.६, गिरणाधरण ४९.६, नाशिक ५२.४, येवला ३३. 

    मराठवाडा ः सोयगाव ६१, अंबाजोगाई ४३, धारूर ५५, माजलगाव ६०, औंढा नागनाथ ३८, वसमत ५७, भोकरदन ३७, देगलूर ३२, हादगाव ४२, मानवत ३५, पाथरी ३७, सोनपेठ ६०. 

    विदर्भ : अमरावती ४३.७, भंडारा ४६, सावळी ४२.३, गडचिरोली ४६.८, मौदा ३७.६, सावनेर ४०.७, आर्वी ३०.७, उमरखेड ३२.१.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com