कोकणात धुवाधार पाऊस

पाऊस
पाऊस

पुणे ः कोकण किनारपट्टीत तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारीही (ता. २५) धुवाधार पाऊस सुरू होता. या भागातील जनजीवन विस्कळित झाले.  सिंधुदुर्गला झोडपले सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. किनारपट्टीला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळित झाले. दरम्यान, पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या पिता-पुत्राला देवगड येथे वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आहे. जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरूवारी (ता. २५) चौथ्या दिवशी कायम राहिला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किनारपट्टीच्या गावांना पावसाने चांगलेच झोडपले. वेंगुर्ला, मालवण, देवगड, सांवतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांत पूरस्थिती आहे.   रत्नागिरीत पावसाचा जोर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी दरडी कोसळून घरांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागाकडे जाणारे मार्ग बंद झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. फुणगूस येथे घराशेजारील जमिनीला भेगा गेल्या असून राजापुरात भराडी गावाजवळ दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाला आहे.गुरुवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ८७.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड ९८, दापोली १२४, खेड ९२, गुहागर १०२, चिपळूण ५६, संगमेश्‍वर ८२, रत्नागिरी ९३, लांजा ९४, राजापूर ४६ मिमी नोंद झाली आहे. १ जूनपासून जिल्ह्यात २४९० मिमी सरासरी पाऊस झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस थुळवाडी परिसरात जमिनीला मोठ्या प्रमाणावर तडे जात आहेत. येथील शंकर कुळकर्णी यांच्या घरासमोर जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्या दिवसेंदिवस रुंदावत असून घराला धोका निर्माण झाला आहे. सरपंच सांची भोसले यांच्यासह फुणगूस तलाठी यांनी थुळवाडी आणि परिसरात पाहणी करून अहवाल तहसील कार्यालयाला पाठविला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार मुंबई ः काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. शहरांसह जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी पाणी साचले होते. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून, धरणसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. रेल्वेगाड्याही उशिरा धावत होत्या. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती. मात्र मंगळवार रात्रीपासूनच पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. या पावसाने बळिराजा सुखावला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरले पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात बुधवारी रात्री सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले. मध्यरात्री १ ते पहाटे तीनच्या दरम्यान रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे दोन धक्के तर २.८ आणि २.९ तीव्रतेचा एक एक धक्का बसल्याने नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आले आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. २०१९ मध्ये भूकंपाच्या ३० ते ३५ सौम्य धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे रात्रभर पाऊस पडत असताना दुसरीकडे भूकंपाचे धक्के बसत होते. कठीण परिस्थिती असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणेच पसंत केले. आम्ही पावसात भिजत थांबलो कारण घरात गेलो तर भूकंपाच्या धक्क्यांची आम्हाला भीती वाटत होती असे गावकऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com