कोकणात जोरदार पाऊस

माथेरान येथे २२७ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागांतही जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी अचानक वाढली.
satara dam.
satara dam.

पुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. माथेरान येथे २२७ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागांतही जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी अचानक वाढली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भात खाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारपासून या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस  पडत आहे. 

औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे. विदर्भाच्या पूर्व भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. नागपूरमधील कामठी येथे सर्वाधिक ५४.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. लाखणी, मोहाडी, ब्रह्मपुरी, चिमूर, कोर्ची, भिवापूर, हिंगणा, नेर येथे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. 

सांगली कोल्हापूरला दणका  सांगली, कोल्हापूर भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नद्यांतील पाणीपातळी सात ते दहा फुटांनी वाढल्याने कृष्णा, वारणा दोन्ही नद्यांवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले. नदीकाठावरील हजारो विद्युत पंप बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील चांदोली, वारणावती, मांगले, शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज या तालुक्यांसह सांगली शहरात अतिवृष्टी झाली. तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तलाव, बंधारे ओसंडून वाहत आहेत. कोल्हापुरातही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे  डहाणू २१८.८, पालघर १४०, वसई १७६, १००.२, खालापूर १२६., माणगाव १०२, पनवेल १६७, रोहा सुधागड पाली १४०, तळा ११२, चंदगड १२३, लोणावळा १३४.३, महाबळेश्‍वर ११०.६.  राज्यात शुक्रवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्रोत ः हवामान विभाग  कोकण : सांताक्रूझ ८३.३, वाडा ५८, कर्जत महाड ७४, म्हसळा ६८, पेण ८५, पोलादपूर ८१, श्रीवर्धन ६५, उरण ६०, चिपळूण ८०, खेड ८४, लांजा ८०, मंडणगड ८४, राजापूर ५५, संगमेश्‍वर ७९, दोडामार्ग ७६, कुडाळ ४४, मुलदे (कृषी) ४५, सावंतवाडी ५०.२, वैभववाडी ६३. 

मध्य महाराष्ट्र : आजरा ९२, गगनबावडा ७६, गारगोटी ५३, हातकणंगले ६२, राधानगरी १७७, शाहूवाडी ५०, इगतपुरी ३८, भोर ७४, पौड ६२, वेल्हे ८७, सातारा ७४.६. 

मराठवाडा : सिल्लोड ३८, मंठा १०५, किनवट ६५. 

विदर्भ : बटकुली ३०.३, लाखणी ५२.२, मोहाडी २२.२, ब्रह्मपुरी ३३.२, चिमूर ३०.६, गोंडपिंपरी २४, नागभिड ३०.३, कोर्ची ४९.६, भिवापूर ४८.९, हिंगणा ३६.८, कुही ३२, पारशिवणी ३९.३, उमरेर ३०.२, नेर ४७, यवतमाळ ३२.३. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com