कोल्हापुरात जोर, सांगलीत हलक्या सरी

कोल्हापुरात जोर, सांगलीत हलक्या सरी
कोल्हापुरात जोर, सांगलीत हलक्या सरी

कोल्हापूर, सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी (ता. २९) पावसाचा जोर कायम राहिला. विशेष करून पश्‍चिमेकडे जोरदार पाऊस सुरू होता. राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. इतर धरणांतही समाधानकारक पाणीसाठा होत असून, धरणांच्या पाणीसाठ्यात गतीने वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंत ८.५० मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्‍यात ४३.८ मिलिमीटर पाऊस झाला. चांदोली धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात सोमवारअखेर ७.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघू प्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे; कासारी नदीवरील बाजारभोगाव, बालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज, तुळशी नदीवरील बीड, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडेली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिरगाव व खोची, कडवी नदीवरील सवतेसावर्डे, शिरगाव व पाटणे, दुधगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली, बस्तवडे व दत्तवाड असे एकूण ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. 

सोमवारी दुपारी शहरातील कळबा तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कोयना धरणात ६५.६५ टीएमसी, तर अलमट्टी धरणात ११७.३७६ इतका पाणीसाठा आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत गगनबावड्यात सर्वाधिक ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सांगली जिल्ह्यात आठ दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने माळरानावरची पिके धोक्‍यात आली होती. पण, दोन दिवस पाऊस सुरू झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. रविवारी (ता. २८) पावसाने उघडीप दिली. सोमवारी (ता. २९) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. चांदोली धरणात २६.०३ टीएमसी म्हणजे ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांत वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्‍यातील सर्वच ओढ्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

शिराळा वाळवा तालुक्‍यात दमदार पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले आहे. रविवारपासून पुन्हा धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी कमी होत आहे. शिराळा तालुक्‍यात थांबून थांबून पावसाच्या मोठ्या सरी येत होत्या. कृष्णा नदीची पाणीपातळी कृष्णा पूल कऱ्हाड येथे १०.९ फूट, आयर्विन पूल, सांगली येथे १० फूट, तर अंकली पूल येथे २५.११ फूट इतकी आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला आहे. मात्र आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्‍यांत गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतातुर आहेत. खरीप हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत. 

तालुकानिहाय पाऊस (मिमी) 

तालुका  पाऊस
मिरज
जत
खानापूर-विटा  २.२
वाळवा-इस्लामपूर १४.३
तासगाव १.२
शिराळा  ४३.८
आटपाडी
कवठेमहांकाळ १.१
पलूस १.५
कडेगाव ३.६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com