लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊस

राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण निवळून ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही भागांत अजूनही दमदार पाऊस पडत आहे.
crop damage
crop damage

पुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण निवळून ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही भागांत अजूनही दमदार पाऊस पडत आहे. लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. मराठवाड्यात होत असलेल्या पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असून अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पिकांतील वाफसा स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने शेती कामे सुरू होत आहेत. मात्र, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाचा जोर बऱ्यापैकी आहे. नांदेडमधील पासदगाव शिवारात अतिवृष्टीमुळे गंगाधर जाधव यांच्या सोयाबीन पाण्याखाली आहे.  परभणीतील सायाळा सुगाव येथे गोदावरी नदीला महापूर आल्याने गोदावरीची उपनदी इंद्रायणीचे पाणी तुंबले असून सायाळा सुनेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मुळी शिवारात कापणी केलेल्या सोयाबीनचे पीक भिजून नुकसान झाले. विदर्भातही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. बुलडाणा, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. पाऊस कमी झाल्याने शेतातील फवारणीचे कामे वेगाने सुरू आहेत. तर काही ठिकाणी काढणीचे कामे सुरू आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र, इतर भागात ऊन पडल्यामुळे बाजरी, तूर, सोयाबीन पिकांची काढणी वेगाने सुरू झाली आहे. तर मूग, उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास काढणी पूर्ण होऊन रब्बीची तयारी शेतकरी करतील अशी अपेक्षा आहे. खानदेशातही पावसाचा जोर कमी झाल्याने शेतीकामे वेगाने सुरू आहेत.   कोकणातही पाऊस कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसात भातकापणी करायची कशी असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दररोज सकाळपासून पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातपिके परिपक्व झालेली आहेत. परंतु पावसामुळे भातकापणी करता येत नाही, अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.  काही ठिकाणी भातपिके जमिनीवर कोसळली आहेत. त्यामुळे जर पावसाचे प्रमाण असेच राहिले तर या पिकांचे नुकसान अटळ आहे. भातकापणी करता येत नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान रविवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती.

रविवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला  पाऊस (मि.मी.मध्ये) ः (स्त्रोत, हवामान विभाग)          कोकण : महाड १०, चिपळूण २५, गुहागर २४, हर्णे २९.६, लांजा १६, रत्नागिरी १३.९, दोडामार्ग २७, कणकवली ३१, कुडाळ १०, वैभववाडी १४.  मध्य महाराष्ट्र : आजरा १२, राधानगरी २०, गिरणाधरण ११.२, महाबळेश्वर २३.३.  मराठवाडा : औंढा नागनाथ ३३, वसमत २२, अहमदपूर ३१, जळकोट २६, रेणापूर ३३, अर्धापूर २३, भोकर ५२, बिलोली २०, देगलूर ५२, हादगाव ६७, किनवट ३७,  मुदखेड ४४, मुखेड ३८, नायगाव खैरगाव ३४, उमरी २४, कळंब १९, उमरगा ३२, पुर्णा ३३.  विदर्भ : लोणार २०.२, कळमेश्वर १६, रिसोड ३५.९, वाशिम १२.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com