मराठवाड्यात पावसाचा दणका

पूर
पूर

पुणे : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने दणका दिला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ओढे, नाले, नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. पावसामुळे विदर्भासह मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. तर कोल्हापुरात पावसाने जोर धरल्याने नऊ बंधारे पाण्याखाली गेले. सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील श्रीवर्धन, तळा, लांजा आणि मराठवाड्यातील सेनगाव येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.    कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाला सुरवात झाल्याने राधानगरी विद्युत विमोचकातून, तसेच कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाण्यात काहीशी वाढ होण्याची शक्‍यता आहे. तुळशी मोठा प्रकल्प, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सहा बंधारा पाण्याखाली आहे. भोगावती नदीवरील खडक कोगे बंधारा, तर वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे पाण्याखाली आहे.  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ४, परभणीतील ७, हिंगोलीतील २ मंडळांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. लोहा तालुक्यात दुचाकीवरून जाणारे दोन युवक ओढ्याच्या पुरात वाहून गेले. पालम तालुक्यातील जोरदार पावसामुळे गळाटी, लेंडी या नद्यांच्या पुरामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे ११ गावांचा संपर्क तुटल्याची स्थिती पाहायला मिळाली. दुधना, करपरा या नद्या प्रवाहित झाल्या. नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड परिसरात ओढे-नाल्यांना पूर आले. धानोरा - मक्ता (ता. लोहा) येथे दोन शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि हत्ता परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना पूर येऊन पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले.  बुलडाण्यातील ज्ञानगंगा नदीवर असलेला प्रकल्प भरल्याने नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. नदीकाठावर असलेल्या नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच सतर्क राहून पूर आल्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत - हवामान विभाग) : कोकण : डहाणू ५८, जव्हार २०, पालघर ४२, तलासरी ६८, वसई ३७, विक्रमगड २६, वाडा ६५, भिरा ४८, कर्जत २४, खालापूर २०, महाड २४, माणगाव ४६, म्हसळा ७८, मुरूड ६१, पेण ८०, पोलदापूर २२, रोहा ९१, श्रीवर्धन १००, सुधागड ६५, तळा १४०, चिपळूण ४८, हर्णे ९१, खेड २४, लांजा १०५, मंडणगड ५९, राजापूर ८. मध्य महाराष्ट्र : जामखेड २२, नेवासा ३३, शेवगाव २०, धुळे ८३, भाडगाव २९, चोपडा ४६, दहीगाव ५९, एरंडोल २६, पारेळा ४८, आजरा ३५, चंदगड ३२, गगनबावडा ४१. मराठवाडा : औंढा नागनाथ ५५, सेनगाव १०४, निलंगा ३९, भोकर ४१, देऊळगाव ३२, हिमायतनगर ३६, कंधार ४०, लोहा ९५, मुदखेड ५८, भुम ४१, लोहारा ३०, उस्मानाबाद ४४, तुळजापूर ३८, वाशी २९, जिंतूर ६७, मानवत ३२, पालम ५६, पाथरी २८, सोनपेठ ४१. विदर्भ : तुमसर २०, मातोळा २५, अरमोरी ८४, चामोर्शी ४४, धानोरा ४६.  पावसाचा जोर वाढण्याची शक्यता​ दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ३) राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर, तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड तुरळक ठिकाणी जोरदार शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com