पावसाने मराठवाड्यात पुन्हा दाणादाण

पावसामुळे सिंदफणा नदीवरील बंधारे भरुन वाहू लागले
पावसामुळे सिंदफणा नदीवरील बंधारे भरुन वाहू लागले

पुणे : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २४) दमदार पावसाने हजेरी लावत पुन्हा तडाखा दिला आहे. सहा जिल्ह्यांतील ३१ मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणीतील सेलू तालुक्यातील देऊळगाव येथे सर्वाधिक १९१, नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे १३४, बीडमधील आडगाव येथे १८०, तर नित्रूड येथे १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नगर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अरबी समुद्रातील ‘क्यार’ वादळामुळे कोकणात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.  

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, सहा जिल्ह्यांतील ३१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. बीडमधील वडवणी, परभणीतील सेलू, पाथरी, मानवत; लातूरमधील अहमदपूर, नांदेडमधील मुखेड तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरिपातील सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांना फटका बसला. सीताफळासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ मंडळांपैकी २५६ मंडळांत पावसाची हजेरी लागली. नांदेड, परभणी जिल्ह्यांतील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात सर्वाधिक १९१ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात सर्वाधिक १३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ‘क्यार’ चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पडत असलेला पाऊस, समुद्र खवळून किनाऱ्यावर येणाऱ्या मोठ्या लाटांमुळे समुद्राचे पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे. विविध राज्यांतील सुमारे ७०० हून आधिक नौकांनी सिंधुदुर्गच्या देवगड किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. वादळामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. परिणामी भातशेती भुईसपाट झाली आहे. भातशेतीत पाणी साचले असून, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कापणीयोग्य भातशेती आडवी झाली आहे. बदलत्या हवामानामुळे भातावर लष्करी अळीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. भात जमिनीवर पडून राहिल्याने तयार लोंब्यांना नव्याने कोंब फुटले आहेत. उभ्या असलेल्या पिकातील दाण्यांची मोठ्या प्रमाणात गळ सुरू आहे. 

सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वच पाणीसाठे ओसंडून वाहत आहेत. शुक्रवारी (ता. २५) माण तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव भरून वाहू लागल्याने लाभक्षेत्रातील गावांमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच दिवाळी साजरी झाली. पिंगळी तलावामुळे दहिवडी, पिंगळी, वाघमोडेवाडी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, लोधवडे, मणकर्णवाडी, पळशी या भागाला पाण्याचा चांगला लाभ होतो. गेली दहा वर्षे हा तलाव पूर्णपणे कोरडाच होता. सलगच्या दुष्काळानंतर या वर्षी तालुक्‍यात उशिरा का होईना; पण पावसाने चांगली हजेरी लावली आहे. आंधळी तलाव भरल्याने माण नदी गेल्या चार दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहे. आता पिंगळी तलाव भरून वाहू लागल्याने नदीच्या पाण्यात आणखी वाढ होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २५) सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. आता हवामान बदलाचा नवा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळपासून कुंद हवामान, थंड वारे आणि भुरभुर पडणाऱ्या पावसाने पिकांपुढे संकटाची चाहूल दिली. एकदम उकाड्यातून एकदम गारवा निर्माण झाल्याने आता उभ्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला. सकाळपासून अखंड भुरभुर सुरू असल्याने शेतात जाणे अशक्‍य झाले, त्यामुळे अशा वातावरणात खरीप मळण्याही करू शकत नसल्याची स्थिती आहे.नगर जिल्ह्यातील तब्बल साठ महसूल मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यात आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुरुवारी दुपारनंतर पावसाला जोरदार सुरवात झाली. अगदी शुक्रवारी पहाटेपर्यंत अनेक भागांत संततधार सुरू होती.   अशी आहे स्थिती

  • परभणी, नांदेड, लातूर, बीड, औरंगाबादमध्ये अतिवृष्टी 
  • सोयाबीन, मका, कपाशी पिकांना फटका
  • कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू
  • कोल्हापूर, सातारा, नगरमध्येही सरी
  • असे आहे नुकसान

  • खरीप पिकांची काढणी. मळणीची कामे खोळंबलेलीच
  • खरिपातील सोयाबीन, मका, कपाशीचे नुकसान
  • सीताफळासह अन्य फळपिकांचे मोठे नुकसान
  • कोकणातील भातशेतीला मोठा फटका
  • नाशिक जिल्ह्यात झेंडू फुलांना तडाखा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com