मुंबई, कोकण ‘ओव्हरफ्लो’

मुंबई, कोकण ‘ओव्हरफ्लो’
मुंबई, कोकण ‘ओव्हरफ्लो’

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणाला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरल्याने नद्यांना पूर आले. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीने धरणे वेगाने भरू लागली. या भागात अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर विदर्भ मराठवाड्यातही पावसाने हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली आहे.  ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. सर्वाधिक फटका खेड, चिपळूण तालुक्याला बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील पूल रात्री बंद ठेवण्यात आला होता. तर चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी गाव जलमय झाले होते. रस्त्यावरील गाड्या पुराच्या पाण्यात अडकून पडल्या होत्या, तर दुकानांमध्येही पाणी घुसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड तालुक्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने नद्या, नाल्यांना पूर आल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आंध्र, कासारसाई, वडिवळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमेच्या खोऱ्यातील पवना, मुळा-मुठा, इंद्रायणी, भीमासह अनेक नद्यांना पूर आल्याने उजनीच्या पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे.  नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) दुपारनंतर संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधारेमुळे इगतपुरी तालुक्यात दारणा धरण पाणलोट क्षेत्रातील घोटी, इगतपुरी, भावली या परिसरात झालेल्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली. नगर जिल्ह्यामध्ये अजून पावसाचा जोर नसला, तरी भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात मात्र जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र दिवसभर रिमझिम पाऊस राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत १० फुटांनी वाढ झाल्याने नदीवरील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.खानदेशात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जामनेर, सातपुडा पर्वतातील काही भागांत अतिवृष्टी म्हणजेच सलग ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सातपुडा पर्वत भागातील लहान नाल्यांना चांगले प्रवाही पाणी आले आहे. गिरणा, अंजनी या नद्यांना मात्र पूर आलेला नाही.   औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १६५ मंडळांत पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात मोजक्‍याच ठिकाणी तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४५ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात धरणक्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणाच्या परिसरात पाऊस नसला, तरी वरच्या बाजूने सोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यावर उणे पातळीत गेलेले धरण लवकरच बाहेर येणार आहे. शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत - हवामान विभाग) : कोकण : माथेरान ४४०, पेण ४००, मुरबाड ३३०, उल्हासनगर ३००, अंबरनाथ २८०, कर्जत २७०, खालापूर, रोहा, पनवेल प्रत्येकी २४०, चिपळूण, कल्याण प्रत्येकी २३०, तळा, सांताक्रुझ, भिरा प्रत्येकी २२०, पोलादपूर २१०, मागाव, महाड, अलिबाग प्रत्येकी २००, शहापूर, खेड, सुधागडपाली, भिवंडी, पत्येकी १९०, ठाणे १६०, मुरूड १५०, म्हसळा १३०, दोडामार्ग १२०, वाडा ११०, लांजा, सावंतवाडी प्रत्येकी १००, गुहागर, कुलाबा, श्रीवर्धन, उरण प्रत्येकी ९०, राजापूर, वाल्पोई, मोखेडा प्रत्येकी ७०.  मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २४०, इगतपुरी २१०, पौड २००, वेल्हे १८०, वडगाव मावळ १६०, पाटण १५०, त्र्यंबकेश्वर १४०, जवळीमेढा १३०, भोर १२०, घोडेगाव ९०, पन्हाळा, पुणे शहर, राधानगरी प्रत्येकी ८०, पेठ, सातारा, शिरपूर, चंदगड, कोल्हापूर, शिराळा प्रत्येकी ७०, कराड, आजरा प्रत्येकी ६०, गारगोटी, कोरेगाव, खंडाळा, नवापूर प्रत्येकी ५०, कडेगाव, जळगाव, जुन्नर, अक्कलकुवा, चोपडा, यावल प्रत्येकी ४०.  मराठवाडा : हिमायतनगर ७०, सोयगाव ६०, हदगाव, औंढा नागनाथ प्रत्येकी ५०, सेलू, पाथरी, पत्येकी ४०, परतूर, पुर्णा, हिंगोली, उदगीर, भोकर, कंधार, परभणी, माजलगाव, पालम प्रत्येकी ३०. मंथा, सेनगाव, कळमनुरी, नायगाव खैरगाव, लोहा, बिलोली, अर्धापूर, वसमत, उमरी, जिंतूर, मुखेड, घनसांगवी, मुदखेड, बदनापूर, धर्माबाद प्रत्येकी २०.   विदर्भ : चिखलदारा, अंजणगाव प्रत्येकी ६०, रामटेक, तिवसा प्रत्येकी ५०, सिरोंचा, परतवाडा, संग्रामपूर, चांदूरबाजार, धारणी प्रत्येकी ४०, अकोट, अमरावती, अर्वी, तेल्हारा, मालेगाव, जळगाव जामोद, नरखेड, सिंदखेडराजा, रिसोड, धामणगाव रेल्वे, वर्धा, भामरागड, दर्यापूर, वाशिम, लोणार, वरूड, काटोल प्रत्येकी ३०. घाटमाथा : आंबोणे ३९०, लोणावळा, ताम्हिणी ३३०, खंद, शिरगाव ३१०, डुंगरवाडी २९०, वाणगाव, भिवापूर २६०, कोयना २५०, वळवण २४०, ठाकुरवाडी, धारावी, शिरोटा २००.  जनजीवन विस्कळित

  • मुंबई, कोकणातील पाच जिल्हे बहुतांश भाग; नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार वृष्टीने जनजीवन विस्कळित
  • मुंबईतील मुसळधार पावसाने विमान सेवेवर परिणाम, ११ विमाने रद्द, ७ विमानांच्या मार्गात बदल
  • उल्हास नदीला पूर महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणीनजीक अडकली. एनडीआरएफकडून १०५० प्रवाशांची सुटका.
  • मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात रेल्वे सेवेवर परिणाम, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित, कल्याण ते बदलापूर रेल्वे सेवा बंद
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस, जुना एक्स्प्रेस, मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण - कराड महामार्ग ठप्प. 
  • कोकणातील नद्या ओव्हरफ्लो. कुंडलिका, आंबा, पातळगंगा, जगबुडी, वाशिष्ठी, घोड, सावित्री, काळ, भातसा, उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
  • रायगड जिल्ह्यात भात शेती पाण्याखाली, मोठ्या नुकसानीची भीती
  • नाशिकमधील गोदावरी, अहिल्या नद्या दुथडी. इगतपुरी, घोटी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीत पावसाचा जोर
  • पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे भीमा, इंद्रायणी, वेळू, मुळा-मुठा, पवना, नीरा नदीला पूर आला.
  • भीमा नदीला पूर आल्याने उजनीच्या पाणीपातळीत होणार वाढ
  • कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पातळी जोरात वाढत असून, २७ बंधारे पाण्याखाली गेले.
  • मराठवाडा, विदर्भ, खाणदेशातही पावसाची हजेरी, सर्वदूर पावसाने खरीप पिकांना जीवदान 
  • पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे हातूनरचे दरवाजे उघडले.
  • कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस शक्य बंगालच्या उपसागरात असेलेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात दमदार, तर मराठवाडा, विदर्भातही चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. कमी दाबचे क्षेत्र सक्रिय असल्याने आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार, तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. ३१) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.   राज्यात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : माथेरान ४४०, पेण ४००, आंबोणे ३९०, लोणावळा ३७०, ताम्हिणी ३३०, मुरबाड ३३०, उल्हासनगर ३००, खंद ३१०, शिरगाव ३१०.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com