मुंबईसह कोकणात धुवांधार 

कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईसह कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.
rain
rain

पुणे : कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईसह कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. ठाण्यात सर्वाधिक ३७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे शहराचा भाग जलमय झाला आहे. रविवारी दिवसभर पाऊस सुरूच असून, घाटमाथ्यावरही पावसाने जोर धरला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.  मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पाऊस झाला; तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच घरांमध्ये पाणी शिरले. मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यात कमी जास्त प्रमाणात पावसाचा जोर सुरू होता. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रविवारी काहीशी विश्रांती घेतली. जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुनासह काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मात्र पावसाचा जोर ओसरला आणि पाणी पातळी स्थिर झाली. मंडणगड ते वेळास मार्गावर दरड कोसळली तर चिपळूण खेर्डी परिसरात दहा घरांत पावसाचे पाणी घुसले होते. मंडणगड तालुक्यातील भारजा, निवळी या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. उमरोली-शिपोशी मार्गावर तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.  राजापुरात अर्जुना नदी भरून वाहत असून, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरीतील काजळी नदीचे पाणी वाढले आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील सोनवी, बावनदी, असावी, शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या भातशेतीत पाणी घुसले होते. नदीकिनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी व नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने भात लावणीसाठी गेलेले ४० हून अधिक शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले. मानवी साखळी तयार करून त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.  पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ हवामान असून, कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे.  रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :  कोकण : कुलाबा १३०, सांताक्रूझ २००, डहाणू ५६, जव्हार ७३, पालघर १४१, तलासरी ८५, वसई १४४, विक्रमगड ९९, वाडा ६७, अलिबाग १०५, भिरा १६५, कर्जत ११५, खालापूर ११०, महाड ६६, माणगाव ८५, माथेरान २०९, म्हसळा २१५, मुरूड १२०, पनवेल २१०, पेण १५०, पोलादपूर १७३, रोहा १२०, श्रीवर्धन २३४, सुधागडपाली १२८, तळा १३३, उरण २१५, चिपळूण १७२, दापोली १८७, गुहागर १०३, हर्णे १०३, खेड १४०, लांजा १०५, मंडणगड २५३, राजापूर १६५, रत्नागिरी ६२, संगमेश्वर ११६, देवगड १०६, दोडामार्ग १६२, कणकवली १३३, कुडाळ ८०, मालवण ११२, रामेश्वर ५७, सावंतवाडी १२०, वैभववाडी ७९, वेंगुर्ला ६३, अंबरनाथ १३९, भिवंडी १४०, कल्याण १९२, शहापूर ६०, ठाणे ३७७, उल्हासनगर १६७.  मध्य महाराष्ट्र : कोपरगाव ३६, अंमळनेर ३१, यावल ३५, आजरा ५२, चंदगड ३३, गगनबावडा ९८, राधानगरी ३४, गिरणा धरण ७९, ओझरखेडा ३०, सटाना ३५, लोणावळा कृषी १११, वेल्हे ४३, जावळीमेढा ३६, महाबळेश्‍वर १३६.  मराठवाडा : सिल्लोड २७, आंबड २०, जाफ्राबाद २३.  विदर्भ : पातूर २२, मोर्शी ३०, ब्रह्मपुरी २६, अहेरी २३, भामरागड ७०, कुरखेडा २५, मुलचेरा १०७, सिरोंचा ३८, भिवापूर २६, सेलू ३०, वर्धा ३४, करंजालाड २६, मालेगाव ३२, मंगरूळपीर २४, दारव्हा २३, नेर ३४.  कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस शक्य  गुजरातमधील कच्छ आणि परिसरावर तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगाललगतच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस या कमी दाब क्षेत्रादरम्यान विस्तारला आहे. यामुळे मुंबईसह उत्तर कोकणात पावसाने जोर धरला आहे. आज (ता. ६) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :  ठाणे ३७७, (जि. ठाणे), सांताक्रूझ २०० (जि. मुंबई), श्रीवर्धन २३४, उरण २१५, म्हसळा २१५, पनवेल २१०, माथेरान २०९ (जि. रायगड), मंडणगड २५३ (जि. रत्नागिरी) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com