मुंबईसह, कोकणात दमदार पाऊस

कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढगांची चांगलीच दाटी झाल्याने मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली.
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊस
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊस

पुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढगांची चांगलीच दाटी झाल्याने मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणात अतिवृष्टी होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत. नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता.  शनिवारी (ता. ४) सकाळापर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला असून, मालवण येथे सर्वाधिक १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाले पुररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तेथील २७ गावांचा सपंर्क तुटला आहे. भंगसाळ नदीचे जुने पूल पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी (ता. ४) सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मुसळधार पावसामुळे वाशिष्टी नदीला पूर आला. किनाऱ्यावरील संपूर्ण लागवडीखालील शेती पाण्याखाली गेली.  सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पश्चिमेकडील सातारा, जावली, पाटण, कऱ्हाड तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. आदिवासी पट्ट्यातील घाटघर, उडदावणे, पांजरे, मुतखेल, रतनवाडी, चिंचोडी, शेंडी, वाकी, पेंडशेत, बारी भागांतील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने शेतजमीनी खरडून गेले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने निघालेले पीक पाण्यात असून शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभे ठाकले आहे.   शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) : कोकण : कुलाबा १६९, सांताक्रुझ १५७, पालघर ५२, वसई ७६, विक्रमगड ४१, भिरा ५९, खालापूर ३४, माणगाव ६०, माथेरान ४६, म्हसळा ६५, मुरूड ६९, पनवेल ९२, पेण ४०, पोलादपूर ४८, रोहा ८३, श्रीवर्धन ८८, सुधागडपाली ६५, तळा १४१, उरण, ७३, चिपळूण ९६, दापोली १४२, गुहागर ११०, हर्णे १६५, खेड ६०, लांजा ७९, मंडणगड ६०, राजापूर ९८, रत्नागिरी ६९, संगमेश्वर ४३, देवगड १००, दोडामार्ग ६९, कणकवली ६६, कुडाळ ११०, मालवण १९३, रामेश्वर ८२, सावंतवाडी १०४, वैभववाडी ६७, वेंगुर्ला १४५, आंबरनाथ ८३, भिवंडी ५५, कल्याण ६०, ठाणे ७१, उल्हासनगर ८०.  मध्य महाराष्ट्र : साक्री ४३, गगणबावडा ८३, चंदगड ३०, देवळा ३१, लोणावळा कृषी ३०, महाबळेश्वर ७०.मराठवाडा : कन्नड ३२, धारूर ४४, घनसांगवी ६२, हिमायतनगर ३६, किनवट ६१,विदर्भ : सिंदेवाही ३७, सिरोंचा ३७, कामठी ४१, हिंगणघाट ३९, मानोरा ४७, दारव्हा ४३, नेर ३३. १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे कुलाबा १६९, सांताक्रुझ १५७ (मुंबई), तळा १४१ (जि. रायगड), दापोली १४२, हर्णे १६५, गुहागर ११०, (जि. रत्नागिरी), मालवण १९३, वेंगुर्ला १४५, कुडाळ ११०, सावंतवाडी १०४, देवगड १००, (जि. सिंधुदुर्ग). कोकणात जोरदार पावसाची शक्यता  अरबी समुद्रातून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारलेला किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. ५) कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा ‘रेड आलर्ट’, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नाशिकमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com