मुंबई, कोकण, पूर्व विदर्भात मुसळधार 

मुळा नदीला पूर आल्याने भातपीक पाण्याखाली गेले
मुळा नदीला पूर आल्याने भातपीक पाण्याखाली गेले

पुणे   : मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड, घाटमाथा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. रायगडमधील खालापूर येथे सर्वाधिक २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. मिठीनदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतीनगर पाण्याखाली गेलं असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकानं बचावकार्य हाती घेतले आहे. दुपारपर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पावसामुळे विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील ठाणे-मुंबई सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

रायगडमध्येही सर्वाधिक पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफची दोन पथके पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बावनदीसह काजळी, अर्जुना, कोदवली या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून मुंबई, रायगडसह केरळ, कर्नाटकातील दोनशे नौका जयगड (ता. रत्नागिरी) बंदरात दाखल झाल्या आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटात दरड कोसळली असून, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे शुक, शांती, अरुणा आणि इतर नद्यांतून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असून, कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहराला पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच होती, कोयना धरणातून ७३ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणातून बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता दरवाजा व पायथा वीजगृहातून ७३ हजार ६३ क्सुसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसामुळे पहिल्या टप्प्यातील पेरण्या झालेल्या पिकांना फायदा होणार आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाची गरज आहे. 

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे. 

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून, पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील २०० गांवाचा संपर्क पाण्यामुळे तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहिता यासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती गेल्या दोन दिवसांपासून कायम आहे. शेकडो घरे आणि वस्त्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली. अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपुरातदेखील बुधवारी मुसळधार पाऊस झाला. 

बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : कुलाबा १२२, सांताक्रूझ ११८, डहाणू १००, पालघर १२७, वसई १३१, अलिबाग ९३, भिरा १८५, कर्जत १५५, खालापूर २६८, महाड ९१, माणगाव २६०, म्हसळा १८०, मुरूड १८५, पनवेल १४०, पेण १३५, पोलादपूर ११४, रोहा २५७, श्रीवर्धन १४०, सुधागडपाली १४२, तळा १७५, उरण २३०, चिपळूण १४०, गुहागर ९३, खेड ११०, लांजा ८२, मंडणगड ९५, राजापूर ११५, रत्नागिरी ८९, संगमेश्वर ८३, देवगड ९१, दोडामार्ग ११८, कणकवली १०१, रामेश्वर १०७, अंबरनाथ १००, भिवंडी १६०, कल्याण ८३, ठाणे १९४, उल्हासनगर १०८.  मध्य महाराष्ट्र : अमळनेर ४०, चंदगड ४०, गगनबावडा ९१, गारगोटी ४९, पन्हाळा ४५, राधानगरी ३५, पौड ९९, वडगाव मावळ ५४, महाबळेश्वर १३३.  मराठवाडा : अंबाजोगाई ३२, केज ५२, वाडवणी ३८, भूम ४२, कळंब ३२.  विदर्भ : भंडारा ४४, लाखणी ४५, मोहाडी ५०, तुमसर ५५, भद्रावती ३७, पोंभुर्णा ७५, सावळी ३४, अहेरी ६७, अरमोरी ३७, भामरागड २४३, चामोर्शी ९२, एटापल्ली ५६, गडचिरोली ६४, कोर्ची ५८, आमगाव ३९, अर्जुनी मोरगाव ५४, कळमेश्वर ७२, कुही ४२, मौदा ४७, रामटेक ४३, समुद्रपूर ३२.  घा टमाथा : डुंगरवाडी २५०, धारावी २४०, खोपाली २३०, लोणवळा २२०, दावडी २००, भिरा १९०, वळवण, शिरगाव १७०, कोयना पोफळी १३०. 

पावसाचा जोर कायम राहणार  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा, उत्तर महाराष्ट्रपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर असलेला कमी दबाचा पट्टा, पाषक स्थितीत असलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ६) पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर पाऊस पडणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.    २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) : खालापूर २६८, माणगाव २६०, रोहा २५७, डुंगरवाडी २५०, भामरागड २४३, धारावी २४०, उरण २३०, खोपाली २३०, लोणावळा २२०, दावडी २००. 

राज्यातील प्रमुख धरणांतून होणारा विसर्ग (क्युसेक)
कोयना ७२ हजार ३९८
खडकवासला ३१ हजार ४४९
मुळशी २५ हजार २१४
वीर २३ हजार १८५ 
वरसगाव १२ हजार ४३५
पवना १२ हजार ६००
पानशेत ७ हजार ४१९
नीरा देवघर ७ हजार ९३८
भाटघर ७ हजार ८२०
दूधगंगा ६ हजार १०० 
राधानगरी ४ हजार २५६ 
वारणा ३ हजार ६२० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com