मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी

मुर्तिजापूरमध्ये शेतात पाणी साचले
मुर्तिजापूरमध्ये शेतात पाणी साचले

अकोला  : जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच असून, ठिकठिकाणचे नदी-नाले अोसंडून वाहत अाहेत. मंगळवारी रात्री तालुक्यात काही भागांत अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापूर, नवसाळ ही गावे पाण्याखाली आली अाहेत. सर्वांत जास्त नुकसान कुरूम, राजनापूर, खिनखीनी, कवठा, सैदापूर, कार्ली या गावांत झाल्याची माहिती आहे.

मंगळवारी रात्री उशिरा उपरोक्त गावांच्या परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने गावालगत असलेले अंबर नाला, मोरीमाय नाला, जामठी नाला, सैदापूर नाला, कवठा, खिनखीनी हे सर्व नाले तुडुंब भरून वाहू लागले. प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी नाल्यातून पुढे जात नव्हते. तथापि, नाल्याचे बांध फुटून पाणी गावात शिरले. गावात शिरलेल्या पाण्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हेच पाणी शेतात शिरल्याने पिके अक्षरशः खरडून गेली आहेत.

राजापूर येथे पहाटे ५ वाजता पाणी शिरल्याने तेथील शहादेव सोळंके, रामदास हिवराळे, बबनराव सेजव, तुळशीराम सेजव, मनोज कडू, मुकुंदा भागवत, विनोद चक्रे, मारोतराव गाडगे यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषद शाळा व महादेव मंदिरात स्थलांतरित करावे लागले. या नागरिकांच्या घरातील अन्नधान्य ओले झाले. कवठा सोपीनाथ येथील बाळू बाजड यांचे मातीत बांधकाम असलेले अर्धे घर पडून त्यात मोठे नुकसान झाले असून, कुठलीही जीवितहानी झाली नाही.

कुरूम इथेही हीच स्थिती असून इतवारा, आठवडी बाजार, माळीपुरा, शिवनगर, मेन रोड, पंचशील विद्यालय, भोईपुरा, चांभारपुरा, मातंगपुरा, जामठी रोड मुस्लिम वस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने १० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती आहे.

कुरुम गावालगत राष्ट्रीय महामार्ग जात असून, महामार्गाचे काम चालू आहे. याकामामुळे गावाबाहेरून वाहणाऱ्या होळी नाल्याचे पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय या नाल्याला काही अंतरावर चार नाले येऊन मिळत असल्याने नाल्याचे पाणी गावात शिरले. कुरूमनजीक राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, या रस्त्याचे काम करणारे दोन मजूर रस्त्यालगत शेतात एका घरात अडकून पडले होते. माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील यांनी प्रसंगावधान राखून महादेव गुणाजी वऱ्हेकर (वय ६५), विकास नामक मजुरांना पाण्यात दोर टाकून लोकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.

वऱ्हाडात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस तीन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस होत असून अकोला, वाशीम जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहिला. अकोला जिल्ह्यात सरासरी ३१.२ तर वाशीममध्ये सरासरी ३५.३७ मिमी पाऊस झाला. मूर्तिजापूरमध्ये सर्वाधिक ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवस सर्वत्र ढगाळ हवामान असून, काही ठिकाणी संततधार पाऊस कोसळत असल्याने शेतीतील कामे ठप्प झाली अाहेत. जनजीवन विस्कळित झाले अाहे.

अकोला, वाशीममधील तालुकानिहाय पाऊस (मिमी) ः अकोला ३४.८, बार्शीटाकळी २२.३, अकोट २१.५, तेल्हारा २५.५, बाळापूर १९, पातूर २५, मूर्तिजापूर ७० वाशीम ३६.९४, मालेगाव ४५.७५, रिसोड ४९.२५, मंगरुळपीर २५.९६, मानोरा २१.४०, कारंजा ३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com