मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस पडत असलेल्या भागात तापमानात घट झाली आहे. तर उघडीप असलेल्या भागात मात्र ऑक्टोबर हीटचा चटका चांगलाच वाढला आहे. आज (ता. ८) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.       नाशिक जिल्ह्यात रविवारी (ता.६) सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने जिल्हाभर चांगलीच दाणादाण उडवून दिली. येवला आणि बागलाण तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. नाशिक शहरात झालेल्या पावसाने गोदावरीला पूर आला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने द्राक्ष, टोमॅटो, मका, बाजरी, कांदा व इतर भाजीपाला पिकाचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे पूरपाण्याचा अंदाज न आल्याने फरशी पुलावरून वाहून गेल्याने रामचंद्र फकिरा पवार (वय ४५) यांचा मृत्यू झाला.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे (ता. सावंतवाडी) परिसराला वादळाचा तडाखा बसला. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे भातशेती आडवी होत असल्याचे चित्र आहे. भात पिके परिपक्व झालेली असल्यामुळे नुकसान वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वैभववाडी, खारेपाटण, भुईबावडा, फोंडाघाट परिसराला झोडपून काढले.  नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची सुगी, लवकर लागवड केलेल्या कपाशीची वेचणी, मूग, उडदानंतर रबीची पेरणी सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सततचा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. या तीन जिल्ह्यांत रविवारी (ता. ६) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस गारपिटीमुळे खरीप पिके झोडपून निघाली. सोयाबीनच्या शेंगा फुटल्या, कपाशीची पाने, बोंडे गळून पडली. 

बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील काही तालुक्यांमध्ये रविवारी (ता. ६) जोरदार पाऊस झाला असून बुलडाणा तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीटही झाली. सोयाबीन ऐन काढणीचे दिवस सुरू असून, सोयाबीनसह कापूस, भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव, हवेली या तालुक्यांच्या काही भागांत रविवारी (ता. ६) मुसळधार वादळी पाऊस झाला. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. फुलोऱ्यात असलेल्या भात पिकाला आणि रब्बीच्या पेरणीला हा पाऊस पोषक ठरणार आहे. मात्र मुसळधार पावसामुळे भाजीपाला, फुले, कांदारोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. 

सोमवारी (ता. ७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.७ (-१.१), जळगाव ३४.०(-०.६), कोल्हापूर ३०.५(०.१), महाबळेश्वर २३.८ (-०.८), मालेगाव ३३.२ (०.४), नाशिक ३०.८ (-०.८), सातारा ३०.७ (०.८), सोलापूर २९.८ (-२.५), अलिबाग ३३.६ (२.४), डहाणू ३२.३ (०.४), सांताक्रूझ ३४.५ (२.५), रत्नागिरी ३२.१ (१.५), औरंगाबाद ३०.६ (-१.०), परभणी ३२.० (-०.७), नांदेड ३२.० (-१.६), अकोला ३३.५ (-१.२), अमरावती ३३.० (-०.७), बुलडाणा २६.० (-२.०), ब्रह्मपुरी ३४.४ (१.९), चंद्रपूर ३४.०(०.८), गोंदिया ३२.५(-०.३), नागपूर ३४.२ (१.१), वर्धा ३३.४ (०.४), यवतमाळ ३२.०(०.०).

सोमवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :

कोकण : मोखेडा २३. 

मध्य महाराष्ट्र : कर्जत ५५, पारनेर ३८, धुळे ५६, साक्री २६, कळवण २७, नाशिक ४२, सिन्नर ३८, खटाव ३४, 

मराठवाडा : अंबाजोगाई ७३, बीड २३, गेवराई २८, माजलगाव ४०, हिमायतनगर ४१, कंधार ४५, लोहा ३७, नांदेड २०, कळंब २०, मानवत ३८, पालम ३०, परभणी २९, पुर्णा २६.

विदर्भ : देऊळगाव २०.  मॉन्सूनचा परतीचा प्रवास गुरुवारपासून पश्चिम राजस्थानसह उत्तरेकडील राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. हवामान कोरडे झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीसाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. गुरुवारपासून (ता. १०) मॉन्सूनचा परतीचा प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत देशाच्या वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून काढता पाय घेईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्रातून साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. 

. . . . . .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com