राज्यात आजही वादळी पावसाचा अंदाज; पूर्व विदर्भात गारपिटीचा इशारा

राज्यात वादळी पावसाची शक्यता
राज्यात वादळी पावसाची शक्यता

पुणे: राज्यात सकाळपासून वाढलेला चटका, दुपारी घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यानंतर, ढग जमा होऊन सायंकाळनंतर पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. सोमवारी (ता.१६) पुणे, सातारा, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजरी लावली. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी (ता.१६) इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) बावडा, लाखेवाडी, रामवाडी, शेटफळ हवेली, निमगाव केतकी, व्याहाळी, इंदापूर या गावांच्या परिसरात वादळी पावसाचा तडाखा बसला. सायंकाळी साडेसात ते आठच्यादरम्यान जोरदार वादळासह आलेल्या पावसाने शेतामधील उभ्या असलेल्या पिकांची; तसेच ज्वारी, मका व द्राक्षाच्या बागा आणि काढलेला कांद्याचे नुकसान झाले. आंब्याची लहान फळे, बहार गळाल्याने, तर डाळिंबाचे फुलगळीने नुकसान झाले. सातारा जिल्ह्यातील सांगवी (ता. फलटण) येथे सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील गोंदी, वाडीगोद्री, अंतरवाली सराटी येथे रात्री आठनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी, ऊसतोड कामगारांची पळापळ झाली. बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरून बाष्पपुरवठा होत आहे. पूर्व भारतातील ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, छत्तीसगड, मध्य भारतातील मध्य प्रदेश आणि विदर्भात २१ मार्चपर्यंत ढगांची निर्मिती होऊन वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.         नांदुरा तालुक्यात गारपीट बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी (ता.१७) सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात काही गावात जोरदार गारपीट झाल्याचे वृत्त आहे. वादळी वाऱ्यामुळे मका, गहू ही पिके जमिनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभऱ्याच्या आकाराच्या गारा जवळपास १० मिनिटे पडल्याने शेतशिवारात विदारस स्थिती तयार झाली. या जिल्हयात जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. अकोला जिल्हयात सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com