रविवारपर्यंत पावसाचा जोर ओसरणार; त्यानंतर वाढण्याचा अंदाज

रविवारपर्यंत पावसाचा जोर ओसरणार; त्यानंतर वाढणार
रविवारपर्यंत पावसाचा जोर ओसरणार; त्यानंतर वाढणार

पुणे : राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोयना धरण क्षेत्रातील नवजा येथे सर्वाधिक २७० मिलिमीटर पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर दमदार कोसळणाऱ्या पावसाने विदर्भातही जोर धरला. तर मराठवाड्यात हलक्या सरी कोसळल्या. आजपासून (ता. १) राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारपासून (ता. ४) पाऊस पुन्हा सुरू होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. नाशिक, नगर जिल्ह्यातून गोदावरीत सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडी (जि. औरंगाबाद) धरण बुधवारी (ता.३१) दुपारी ४ वाजता ०.२२ टीएमसीने प्लसमध्ये गेले. तर भीमा नदीला पूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास धरणातील पाणीसाठा १०.३९ टक्क्यांपर्यंत पोचला. त्यामुळे सोलापूरवासीयांना चांगलचा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी प्रकल्पामधून गत काही दिवसांत पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे. धरणात होत असलेल्या आवकेमुळे २६.२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. २६ टीएमसी हा जायकवाडीचा मृतसाठा असून, त्यावर ०.२२ टीएमसी साठ्यात वाढ झाली आहे. पाणलोटातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने कोयना धरणाच्या पाणीपातळीतही वेगाने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून, पूर्व भागात मात्र हलक्या ते मध्यम सरी येत आहेत. जवळपास आठवडाभर पडणाऱ्या पावसाने मावळ भागात भातखाचरे ओसंडून वाहत आहेत. पावसाने उघडीप न दिल्याने काही भागांत पेरण्या व शेतीची कामे खोळंबली आहेत. धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने अनेक धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने वीर, खडकवासला, कासारसाई, आंद्रा, चासकमान, कलमोडी, वडज, येडगाव या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.  सांगली वारणा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. चांदोली धरणात पाणीसाठा वाढत असल्याने येत्या २४ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा, वाळवा, पलूस तालुक्‍यांत पावसाची संततधार सुरूच राहिली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेअकरा वाजता पूर्ण भरले. धरणाचे तीन दरवाजे व विद्युतनिर्मिती केंद्रामधून एकत्रित ५६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काळम्मावाडी, वारणा धरणाच्या पाण्यासाठ्यातही वाढ होत आहे. राजाराम पुलाजवळ पंचगंगेची पातळी ४० फूट इतकी होती.  नगर जिल्ह्याच्या सर्वच भागांत बुधवारी (ता. ३१) पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरिपाच्या पिकाला मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यामध्ये पूर्व भागात गायब झालेला पाऊस पुन्हा आला असला, तरी त्यात फारसा जोर नाही. मात्र, खरिपाच्या पिकांना मोठा आधार मिळणार आहे.  खानदेशात बुधवारी (ता. ३१) सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भीज पाऊस झाला. तापी नदीवरील मुक्ताईनगर (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणाचे १९ दरवाजे बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता पूर्ण उघडण्यात आले. भीज पाऊस पिकांसह जमिनीतील जलपातळी टिकवून ठेवण्यासाठी पोषक ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, जामनेर, धरणगाव, जळगाव, धुळे शहरासह शिरपूर, शिंदखेडा, साक्री, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा भागांतही पावसाने हजेरी लावली. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी पावसाने सर्वदूर हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे काही मंडळांतील ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या. परंतु, परभणी जिल्ह्यात रिमझिम पावसाने आंतरमशागतीची कामे खोळंबली. बुधवारी दुपारपर्यंत अनेक मंडळांत ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, जोरदार पाऊस झाल्याने ओढे, नाले, कयाधू नदीला पाणी आले. कळमनुरी सालेगाव रस्त्यावरील सांडस गावाजवळी पूल ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतही रिमझिम पाऊस झाला. अधूनमधून जोरदार सरी पडल्या. 

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : वाडा २३०, जव्हार १४०, पेन, विक्रमगड, मालवण प्रत्येकी १३०, चिपळूण, भिरा, मोखेडा प्रत्येकी १२०, सुधागड, कर्जत, कल्याण, मुरबाड, भिवंडी प्रत्येकी ११०, वसई, माथेरान प्रत्येकी १००, संगमेश्वर, तळा, तलासरी, शहापूर, रोहा प्रत्येकी ९०, पनवेल, वैभववाडी, अलिबाग, गुहागर, मंडणगड, पोलादपूर प्रत्येकी ८० अंबरनाथ, ठाणे, खेड, उन्हासनगर, कणकवली, महाड, दापोली, मुरूड, सांताक्रुझ, खालापूर प्रत्येकी ७०.

मध्य महाराष्ट्र : राधानगरी १८०, महाबळेश्वर १५०, इगतपुरी १३०, लोणावळा, वेल्हे प्रत्येकी ११०, पौड, गगणबावडा, हर्सुल प्रत्येकी ९०, पाटण, त्र्यंबकेश्वर, चंदगड, शाहूवाडी प्रत्येकी ८०, ओझरखेडा, नवापूर प्रत्येकी ७०, कराड, जावळी, माढा प्रत्येकी ६०, पेठ, शिराळा, कागल, सुरगाणा, पन्हाळा, खेड, तासगाव, गारगोटी, कडेगाव प्रत्येकी ५०. 

मराठवाडा : माहूर, औंढा नागनाथ प्रत्येकी ६०, किनवट, कळमनुरी प्रत्येकी ५०, अर्धापूर ४०, हिंगोली, हादगाव, जालना, भोकर, कंधार, मंथा, जळकोट, मुखेड, खुल्ताबाद, फुलांब्री प्रत्येकी ३०.    विदर्भ : पवनी १८०, चांदूर रेल्वे १४०, धामणगाव रेल्वे १४०, भिवापूर १४०, उमरेड १३०, देवळी, आर्वी, वर्धा, समुद्रपूर प्रत्येकी १२०, नांदगाव काझी ११०, मुर्तजापूर, कुही १००, बाभुळगाव, सेलू, मौदा प्रत्यकी ९०, चिमूर, हिंगणघाट, वरोरा, लाखंदूर प्रत्येकी ८०, कुरखेडा, अरमोरी, तिवसा, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, देवरी, हिंगणा, यवतमाळ, आर्णी, कळंब प्रत्येकी ७०. अमरावती, सडकअर्जुनी, राळेगाव, करंजालाड, भद्रावती, लाखणी, कामठी, सावळी, पंढरकवडा, नागभिड, चिखलदरा, साकोली, सिंदेवाही, अकोला, मारेगाव प्रत्येकी ६०. घाटमाथा : कोयना नवजा २७०  आंबोणे २००  कोयना पोफळी १९०  दावडी १७०  शिरगाव, डुंगरवाडी, खोपोली, ताम्हिणी प्रत्येकी १४०  लोणावळा १३०  भीमा १२०, शिरोटा, वाणगाव, खंद ११०  ठाकूरवाडी, भिवापुरी १००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com