कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

आज (ता.६) आणि उद्या (ता. ७) कोकण, घाटमाथ्यावर व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल.
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

पुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ छत्तीसगडपर्यत कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे आज (ता.६) आणि उद्या (ता. ७) कोकण, घाटमाथ्यावर व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील पश्चिम भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

सध्या दक्षिण गुजरातच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि ४.५ किलोमीटर यादरम्यान उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागर, उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल या भागातही कमी दाबाचे क्षेत्र असून पश्चिम बंगालच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मॉन्सूनचा आस असलेला पट्टा बिकानेर, जयपूर, ग्वाल्हेर, सिद्धी, ओडिशा, पश्चिम बंगाल ते बंगालचा उपसागराच्या भागापर्यंत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात रविवारी (ता.९) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात आज (ता.६) अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता.७) व शनिवारी (ता.८) पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा काही काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांशी भागात व विदर्भातील पश्चिम भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. रविवारी (ता.९) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com