पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोटात दमदार पाऊस

खडकवासला धरण
खडकवासला धरण

पुणे : दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला आहे. धरणांना पाणीपुरवठा करणारे झरे, ओढेनाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पाणीसाठ्यात वेगोन वाढ होत आहे. सर्व धरणांमध्ये रविवारपर्यंत (ता.७) २५.९७ टीएमसी (१२ टक्के) चल पाणीसाठा झाला आहे. पुणे शहर, हवेली, दौंड, इंदापूरला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात एका दिवसात एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाले आहे. प्रकल्पात एकूण ५.७५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.  उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. गतवर्षी शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या झळा यामुळे धरणांतील पाणीसाठा खूपच खालावला. यातच यंदा मॉन्सूनचे आगमन उशिराने झाल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने उशिरा जोर धरला. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांची पाणीपातळी वाढत असून, अनेक धरणे चलसाठ्यात आली आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ७ जुलै रोजी धरणांमध्ये ३३.१८ टीएमसी (१५ टक्के) पाणीसाठा होता.  यंदा उजनी धरणाचा पाणीसाठा उणे ६० टक्क्यांपर्यंत खालावला होता. भीमेच्या पाणलोट क्षेत्र आणि जिल्ह्यातील मुक्त पाणलोटात झालेल्या पावसाने उजनीतही हळूहळू पाणी जमा होऊ लागले आहे. रविवारी (ता.७) उजनी धरणात उणे ५६ टक्के पाणीसाठा होता. धरणाच्या अचल पातळीतील ३३.५१ टीएमसी पाणी आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्यानंतर उजनीला पाण्याचा पुरवठा वाढणार असून, तोपर्यंत धरणाची पाणी पातळी वाढण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.   रविवारी (ता.७) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात रविवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : टेमघर ०.१३ (१९०), वरसगाव २.०२ (९२), पानशेत २.८६ (१००), खडकवासला ०.७४ (२२), पवना २.०३ (१२०), कासारसाई ०.११ (९०), मुळशी २.९६ (८६), कळमोडी ०.८० (४५), चासकमान १.०५ (५१), भामा आसखेड १.४६ (५६), आंद्रा १.३७ (२४), वडीवळे ०.५० (१४०), गुंजवणी ०.८४ (९३), भाटघर ३.५९ (३२), नीरा देवघर २.२० (१०४), वीर १.४८ (१३), पिंपळगाव जोगा ० (७३), माणिकडोह ०.५६ (७८), येडगाव ०.०१ (५२). वडज ० (५०), डिंभे १.२४ (९९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com