सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार

सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार
सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार

सांगली : सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पाण्याची पातळी ४५ फूट पाच इंच इतकी झाली. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शिवशंभू चौकात आल्यामुळे सांगली इस्लामपूर मार्ग सकाळपासून बंद करण्यात आला. कोयना आणि वारणा धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने महापुराचा धोका आणखी गडद झाला आहे. दुसरीकडे मुसळधार पावसाचा रत्नागिरी जिल्ह्यातील धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. काजळी नदीच्या रौद्ररूपाने जुवे, हातीस, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्‍वरला बसला. शेकडो घरात पाणी घुसले असून, त्यांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. राजापूर, चिपळूण, संगमेश्‍वरमध्येही तीच परिस्थिती आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणि पश्‍चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांमुळे घरे, गोठे कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. मसुरे येथील जुवा बेटाला समुद्राच्या पाण्याने वेढले आहे. पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सांगलीत जनजीवन विस्कळित

प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नागरिकांना मदतकार्य सुरू केले आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, या भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. 

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी नाही. धरणातील पाणीसाठा ३३.८८ टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणा आणि कृष्णा नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्हा प्रशासनाने महापुराच्या शक्यतेमुळे शाळांना सुटी दिली. कृष्णा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर पोचली. त्यामुळे दुपारनंतर पाणी आणखी काही उपनगरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे. नदीच्या जवळ असलेल्या सिद्धार्थ परिसर राजीव गांधीनगर, मारुती चौक टिळक स्मारक चौक या भागाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. 

मुसळधारेने रत्नागिरी जलमय

सोमवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड १९०, दापोली १०७, खेड १६५, गुहागर १३२, चिपळूण २२०, संगमेश्‍वर १९९, रत्नागिरी २२७, लांजा २०९, राजापूर येथे १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडली आहे. रविवारचा पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह सोमवारीही कायम होता. या पावसाने जिल्ह्यातील सगळ्याच मोठ्या नद्यांना पूर आले. रत्नागिरीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पावसाने धुमाकूळ झाला आहे. कोयना धरणातील पाणी सातत्याने नदीपात्रात सोडण्यात आल्याने वाशिष्ठी नदीने रुद्रावतार धारण केला आहे. किनाऱ्या‍वरील भातशेती, पूल, रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. काजळी नदी किनाऱ्यावरील साटवली, हरचिरी, चांदेराई, हातीस, पोमेंडी, सोमेश्‍वर येथील सुमारे पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी भरले. हातीस येथील प्रसिद्ध दर्ग्यातही पाणी घुसले. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले. नदीकिनाऱ्यावरील भातशेतांमध्येही पाणी घुसल्याने मोठे नुकसान होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात २००५ नंतर प्रथमच अशी पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

साटवली (लांजा) येथे नदीचे पाणी घरात शिरले. चार घरे, एक मदरसा व एक दर्गा पाण्याने वेढला गेला. तेथील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. लांजा तालुक्यातील असोडे धरणाच्या दोन कॉलम वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे शीळ धरणाच्या येथे सांडव्याच्या डाव्या बाजूकडील ७० मीटर लांबीची संरक्षक भिंत पूर्णपणे कोसळली.

सिंधुदुर्गात पूरस्थिती; वाहतूक ठप्प

पावसामुळे भातशेती, बागायतीमध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान झाले. दरम्यान कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, सोमवारी (ता. ५)  सकाळपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्‍प करण्यात आली आहे. आंब्रड पुलावरूनदेखील पुराचे पाणी वाहत आहे. जिल्ह्यातून पश्‍चिम महाराष्ट्राला जाणाऱ्या तळेरे-कोल्हापूर, सांवतवाडी-कोल्हापूर, आंबोली-आजरा गडहिग्लंज या मार्गांवर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीचे प्रकार वाढीस लागले आहेत.

जिल्ह्यातील मुळदे, सडुरे, साळशी, माईण, आंब्रड या भागांतील काही घरे व गोठ्यांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. वादळामुळे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-वेंगुर्ला रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वैभववाडी तालुक्यातील कुसूरमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. कुसूरमध्ये भातशेतीमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मालवण, देवगड आणि वेंगुर्ला किनारपट्टीचा उधाणाचा धोका कायम आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com