सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई तालुक्‍यांतील अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ४१.५८ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस असल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांवर गेला आहे.

जिल्ह्यात रविवारी दुपारपासून अनेक ठिकाणी पावसास सुरवात झाली. अधून मधून दमदार सरी कोसळत होत्या. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. पश्‍चिम भागात संततधार पाऊस सुरू होता. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई तालुक्‍यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील सर्वच कामे ठप्प झाली आहे.

एकट्या महाबळेश्‍वर शहरात २४ तासात २९८. ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वेण्णा लेक परिसर जलमय झाला आहे. पाटण, जावली, सातारा, महाबळेश्वर तालुक्‍यात भात लागवड सुरू आहे. कोरेगाव, कराड, खंडाळा या तालुक्‍यात मध्यम तर माण, खटाव, फलटण या तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

कोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातील कोयना येथे १९२, नवजा येथे २७७, तर महाबळेश्वर येथे १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या धरणातील पाणीसाठ्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४.८६ टीएमीसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात ६९.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. इतर धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी या प्रमुख धरणातील पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांवर गेला आहे.    

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.) ः सातारा २५.९८, जावली ७३.६७, पाटण ५८.४५, कराड १४.१५, कोरेगाव १०.३९, खटाव ४.६१, माण २.२९, फलटण  १.५६, खंडाळा १०.८५, वाई २८.८०, महाबळेश्वर २२६.६०.

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा टक्केवारी ः कोयना ६६.३०, उरमोडी ६०.३५, धोम बलकवडी  ७०.५५, तारळी ६१.८८, धोम ४९.६१, कण्हेर ५८.७३, नागेवाडी २९.६६, मोरणा (गुरेघर) ७१.५६, उत्तरमांड ४६.०८, महू ८.७५, हातगेघर ३१.२८, वांग (मराठवाडी) २५.५५, चिखली ५८.१५,  जांभळी ९७.९३, पांगारे ९३.६१, कुसवडे ५४.१७, काळगाव ८५.५५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com