पावसाचा पुन्हा दणका

काटेवाडी, जि. पुणे ःयेथे पावसामुळे चारा पिके पाण्याखाली गेली होती.
काटेवाडी, जि. पुणे ःयेथे पावसामुळे चारा पिके पाण्याखाली गेली होती.

पुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे. कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. नुकसान कमी करण्याचे प्रयत्नही अपूरे पडत होते. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील माळेगाव येथे १४५ मिलिमीटर झाली.  

पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बारामती तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, जोरदार पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. माळेगाव येथे सर्वाधिक १४५; तर पणदरे येथे ११७, वडगाव निंबाळकर येथे १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये पावसाचा जोर प्रचंड असल्याने शेतामध्ये पाणीपाणी झाले, चारापिके पाण्याखाली गेली. ओढे नाले दुथडी भरून वाहिले. 

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीकामांचे नियोजन बिघडले असून, शेतीमालाचे नुकसान झाले. कांदा, मका, सोयाबीन व द्राक्षबागांना फटका बसला. बाजरी, सोयाबीन व मका पिकाचा काढणी हंगाम सुरू असून, पावसामुळे सोंगणीची कामे थांबली. उन्हाळी कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे खराब होत आहेत. कांदा लागवड व कापूस फुटून वेचणीसुद्धा खोळंबली आहे. निफाड तालुक्यात द्राक्षबागेत डाऊनी, मण्यांना तडे व मणीगळ होऊन नुकसान होत आहे. पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव पावसामुळे वाढला आहे. टोमॅटो, मका, कांदा या पिकांचेही नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आटपाडी तालुक्यातील सुमारे बारा पूल पाण्याखाली गेले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी थांबली आहे. सोयाबीन भिजले, द्राक्षशेतीत पाणी साचल्याने डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला.  

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाने खरीप पिकांच्या कापणीला मोठा दणका बसला असून, सर्व शेतीकामे ठप्प झाली आहेत. कापणीला आलेल्या भाताबरोबर सोयाबीन व भुईमुगाची काढणीही थांबली आहे. शेतशिवारांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. शाहूवाडी तालुक्‍यात चार दिवसांपासून पावसाने खरीप हंगामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने तालुक्‍यात धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेले भात पीक कोलमडून गेले आहे. शेतीकामाचे संपूर्ण वेळापत्रक पावसाने कोलमडले आहे. 

सातारा जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर सोमवारी पावसाने विश्रांती दिली. पाटण तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने भातपिकाचे मोठे नुकसान झाले. शेतीतील सर्व कामे ठप्प झाली असून शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान सुरू आहे. सोयाबीन, भुईमूग, भातकाढणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोयाबीन भिजल्याने डाग; तसेच बुरशी आल्याने सोयाबीन कमी दराने विक्री करावी लागणार आहे. पाटण व जावळी तालुक्यांतील भात, स्ट्रॅाबेरी, भुईमूग शेंगांना फटका बसला आहे. 

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील १४ आणि परभणी जिल्ह्यातील एका मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील चांडोळा मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पाऊस झाला. सततच्या पावसामुळे अनेक मंडळांतील खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोयाबीन, कपाशी, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक मंडळांमध्ये ऐन सुगीत नैसर्गिक आपत्तीमुळे पिके हातची गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस होत आहे. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे. कापूस वेचणीला सुरवात करण्यापूर्वी पाऊस सुरू झाल्याने अडचणी वाढल्या. आधीच सोयाबीन पीक पाण्याने भिजले आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २३.० (-८.७), जळगाव २७.०(-७.८), कोल्हापूर २५.९(-५.५), महाबळेश्वर १९.२(-६.७), मालेगाव २३.८ (-९.६), नाशिक २२.९ (-९.४), सातारा २१.८ (-६.३), सोलापूर ३०.३ (-२.४), अलिबाग २६.५ (-५.९), डहाणू २९.१ (-३.६), सांताक्रूझ २७.६ (-६.०), रत्नागिरी ३०.६(-१.८), औरंगाबाद २५.७ (-६.२), परभणी २६.९ (-५.६), नांदेड ३०.० (०.२), अकोला २६.४ (-७.१), अमरावती २५.८ (-७.८), बुलडाणा २२.० (-८.४), चंद्रपूर ३१.२(-१.५), गोंदिया ३०.५(-१.८), नागपूर २९.६ (-३.१), वर्धा २९.२ (-३.४), यवतमाळ २७.५(-४.२).   पाऊस दृष्टिक्षेपात...

  • पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
  • नाशिक जिल्ह्यात शेतीकामांचे नियोजन बिघडले
  • आटपाडी तालुक्यातील सुमारे बारा पूल पाण्याखाली
  • कोल्हापूर जिल्ह्यात खरीप कापणीला दणका
  • पाटण तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान 
  • नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस 
  • अकोला जिल्ह्यात वेचणीचा कापूस ओला झाला
  • सर्वाधिक पाऊस (मिलिमीटर)...

  • माळेगाव    १४५
  • पणदरेे    ११७
  • वडगाव निंबाळकर    १३८
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com