सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; तिलारी नदी धोक्याच्या पातळीवर

पूर
पूर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. तिलारी नदी धोक्याच्या पातळीनजीक पोचली आहे. त्यामुळे तिलारी नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यावर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी दुपारनतंर मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीनाल्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत होते. पावसामुळे अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. दोडामार्ग तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत या तालुक्यात १६० मि. मी. पाऊस झाला. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तिलारी धरणाचे चारही दरवाजे दीड मीटरने उघडले असून, सध्या धरणातून १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय पडणारा मुसळधार पाऊस यामुळे तिलारी नदीची पाणीपातळी धोक्यानजीक पोचली आहे. या नदीची धोक्याची पातळी ४३.६० मीटर असून सध्या नदीची पातळी ४१.६० इतकी आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे येथील लोकांचे मोठे नुकसान झाले होते. तीच भीती अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. बांधकाम विभागाने दरड हटवून हा मार्ग वाहतुकीस खुला केला. परंतु रविवारी सकाळी आठ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील मांडुकली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडा घाट, राधानगरीमार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com