सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस

सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस
सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस

सोलापूर : जिल्ह्यात माळशिरस, माढा, उत्तर सोलापूर, पंढरपूरसह अनेक भागांत सोमवारी (ता. ३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उच्चांकी तापमानाने उन्हाची काहिली झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळवारे आणि पावसामुळे अनेक घरांची आणि झाडांची पडझड झाली. मंगळवारीही जिल्ह्यात (ता. ४) पुन्हा दिवसभर उन्हासह ढगाळ वातावरण राहिले.  

सोमवारी दिवसभर कडाक्‍याचे ऊन होते. पण सायंकाळी पाचनंतर वातावरणात एकदम बदल झाला. साडेपाच्या सुमारास हलक्‍या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह अनेक भागांत पाऊस बरसला. जिल्ह्यात उशिरापर्यंत थांबून-थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पण वादळी वारेच जास्त असल्याने पावसाचा जोर काही वाढू शकला नाही. रात्री उशिरापर्यंत पाऊस आणि वारे सुरूच होते. सोमवारी सोलापुरात ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नेहमीच्या तुलनेत उन्हाचा चटका कमी असला, तरीही उकाडा मात्र प्रचंड जाणवत होता. 

सोलापूर शहरासह माढा, पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, करमाळा, मोहोळ तालुक्‍यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसात कविटगाव  (ता. करमाळा) येथील शेतकरी अंकुश जगदाळे यांच्या दोन म्हशी वीज कोसळल्याने ठार झाल्या आहेत. जगदाळे यांनी आपल्या म्हशी नदीजवळ चरायला सोडल्या होत्या. या वेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. या वेळी वीज कोसळून त्या मृत्युमुखी पडल्या. 

काही ठिकाणी जुन्या घरांची वादळी वाऱ्याने पडझड झाली. रात्री साडेआठपर्यंत सोलापूर शहर व परिसरात तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवेढा तालुक्‍यातील भोसे, पंढरपूर तालुक्‍यातील करकंब, माढा तालुक्‍यातील मोडनिंब, पिंपळनेर, अक्कलकोट तालुक्‍यातील मैंदर्गी, मोहोळ तालुक्‍यातील नरखेड, माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर परिसरासह तालुक्‍यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com