नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
दक्षिण भारतात मुसळधार पाऊस
बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी चक्रीवादळ हे तमिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जमिनीवर आले आहे.
पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी चक्रीवादळ हे तमिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जमिनीवर आले आहे. हळूहळू हे चक्रीवादळ पश्चिम वायव्य भागाकडे सरकत आहे. त्याची तीव्रता वाढलेली असल्याने वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील लक्षद्वीप, केरळ, कन्याकुमारी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत वादळी वाऱ्यांसह, मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने आज आणि उद्या त्याचा प्रभाव राहणार आहे. त्यानंतर हळूहळू त्याचा प्रभाव कमी होणार आहे. यामुळे भारताच्या दक्षिण भागात ताशी ७० ते ८० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता.३) ते वादळ गुल्फ, मन्नार भागाकडून पश्चिमेकडे सरकत असून, ताशी १६ किलोमीटर वेगाने पुढे सरकत होते. हे चक्रीवादळ आज (ता.४) रामानाथापुरम आणि थुथुकुडी या जिल्ह्यांसह तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी आणि दक्षिण तमिळनाडू व दक्षिण केरळकडे जाण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ पश्चिमेकडे भूपृष्ठ भागावरून सरकत असून, मन्नारपासून पश्चिम वायव्य भागाकडे ७० किलोमीटर अंतरावर होते. तर कन्याकुमारीपासून पूर्व ईशान्य भागाकडे २३० किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे वारे ताशी ७० ते ८० किलोमीटर ते जास्तीत जास्त ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. गुरुवारी सायंकाळी वादळ तमिळनाडू किनारपट्टीवरून पश्चिम वायव्य भागाकडे जमिनीवरून कन्याकुमारीकडे सरकले होते. आजही हे चक्रीवादळ सक्रिय राहणार असून, अरबी समुद्राच्या दिशेने सरकेल.
शनिवारपर्यंत (ता. ५) दक्षिण तमिळनाडू, रामानाथापुरम आणि थुथुकुडी या जिल्ह्यांसह तिरुनेलवेली, तेनकासी, विरुधूनगर, थेनी, मदुराई आणि सिवगंगाईसह दक्षिण उत्तर केरळ या भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) २०, ठाणे २३.२, अलिबाग २०, रत्नागिरी २१.१ डहाणू २०.७ (१), पुणे १३.५ (१), जळगाव १४.२ (१), कोल्हापूर १७.५ (१), महाबळेश्वर १५ (१), मालेगाव १४.२ (२), नाशिक १३ (१), निफाड ११.५, सांगली १५.५, सातारा १४.५, सोलापूर १५.१ (-१), औरंगाबाद १४.२ (१), परभणी १२ (-३), परभणी कृषी विद्यापीठ १०.५, नांदेड १४, उस्मानाबाद १५.४ (१), अकोला १५.२, अमरावती १४.४ (-२), बुलडाणा १५.६ (२), चंद्रपूर १७.६ (३), गोंदिया ११.२ (-२), नागपूर १२.६ (-१), वर्धा १२.५ (-२).
राज्यातील काही भागांत थंड वारे
बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे १०.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
- 1 of 657
- ››